काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचं निधन
पाच वेळेस विधानसभा आणि तीन वेळेस लोकसभा निवडणूक लढवली होती.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचं निधन
पाच वेळेस विधानसभा आणि तीन वेळेस लोकसभा निवडणूक लढवली होती.
नवी दिल्ली; प्रतिनिधी
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचं निधन झालं आहे. शर्मा यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील AIIMS रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री उशिरा पंडित सुखराम शर्मा यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबाबत नातू आश्रय शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम हे 94 वर्षांचे होते. त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक होती. वर्ष 1996 मध्ये पंडित सुखराम यांच्या घरी सीबीआयने धाड टाकत जवळपास चार कोटींची रोकड जमा केली होती. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले.
पंडित सुखराम शर्मा यांचा जन्म २७ जुलै १९२७ मध्ये झाला होता. शर्मा यांनी १९९३ ते १९९६ या काळात केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, तर तीन वेळा त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांचे पुत्र अनिल शर्मा हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा यांचा नातू आयुष शर्मा हा अभिनेता असून त्याने सलमान खानच्या बहिणीशी विवाह केला आहे.