काटी–लाखेवाडी गटात विकासाचा निर्धार; श्रीमंत ढोले यांना संधी देण्याचे चित्रलेखा ढोले यांचे आवाहन
श्रीमंत पोपट ढोले यांना जनतेने भरघोस पाठिंबा द्यावा

काटी–लाखेवाडी गटात विकासाचा निर्धार; श्रीमंत ढोले यांना संधी देण्याचे चित्रलेखा ढोले यांचे आवाहन
श्रीमंत पोपट ढोले यांना जनतेने भरघोस पाठिंबा द्यावा
इंदापूर,आदित्य बोराटे –
इंदापूर तालुक्यातील काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटात विकासाचा ठोस अजेंडा, लोकाभिमुख नेतृत्व आणि राजकीय एकीचे सकारात्मक चित्र समोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पोपट ढोले यांना जनतेने भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन काटी–लाखेवाडी गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच चित्रलेखा ढोले यांनी केले आहे. विकास, सेवा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर गटाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रलेखा ढोले म्हणाल्या की, श्रीमंत ढोले यांना उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानते. ज्या विश्वासाने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी जनतेची भक्कम साथ आवश्यक आहे. काटी–लाखेवाडी गटातील रस्ते, पाणीपुरवठा, शेती, बाजारभाव, उत्पन्नवाढ, महिला सक्षमीकरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस धोरण राबवून विकासासाठी ते कटिबद्ध राहतील.

राज्याचे कृषिमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळाली असून त्यांनी तालुक्यात साडेपाच हजार कोटी रुपयांचा विकास घडवून आणला आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विकासाभिमुख धोरण सर्वश्रुत आहे. या मजबूत विकासात्मक नेतृत्वामुळे काटी–लाखेवाडी गटाचा विकास नव्या उंचीवर जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने तालुक्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राजकीय एकी घडून आली असून, पूर्वीचे वैचारिक मतभेद दूर झाले आहेत. या एकजुटीचा थेट फायदा तालुक्याच्या विकासाला आणि सर्वसामान्य जनतेला होणार आहे, असे चित्रलेखा ढोले यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती निवडणुकीबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट करत सांगितले की, वरकुटे गणामधून माजी सभापती बापूसाहेब शेंडे आणि लाखेवाडी गणामधून विमलताई काळे हे उमेदवार उभे आहेत. बापूसाहेब शेंडे यांनी यापूर्वी लोकांच्या अनेक अडचणी सोडवून अनुभवसंपन्न नेतृत्व सिद्ध केले आहे. पुन्हा संधी मिळाल्यास ते घराघरातील प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विमलताई काळे यांच्या माध्यमातून महिलांच्या अडचणींना न्याय मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, श्रीमंत ढोले यांच्या कन्या अक्षदा ढोले यांनी सांगितले की, वडिलांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारसरणी सर्वश्रुत आहे. काटी–लाखेवाडी परिसराच्या विकासासोबतच शिक्षण क्षेत्रात आधुनिक, अॅडव्हान्स व व्यावसायिक अभ्यासक्रम आणण्यावर त्यांचा भर आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरांकडे जाण्याची गरज भासू नये.

अखेर चित्रलेखा ढोले यांनी तालुक्यातील जनतेला आवाहन करत सांगितले की, काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून श्रीमंत ढोले, वरकुटे गणातून बापूसाहेब शेंडे आणि लाखेवाडी गणातून विमलताई काळे यांना भरघोस मतांनी विजयी करून सेवा व विकासाची संधी द्यावी.






