काटेवाठी येथील बिरोबा देवस्थान परिसराचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
यात्रा काळात मोठ्या संख्येने परराज्यातील भाविक देखील येतात.

काटेवाठी येथील बिरोबा देवस्थान परिसराचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
यात्रा काळात मोठ्या संख्येने परराज्यातील भाविक देखील येतात.
बारामती वार्तापत्र
काटेवाडी (ता. बारामती) येथील बिरोबा देवस्थान परिसराच्या सुशोभीकरणाचा आणि सर्वांगीण विकासाचा मनोदय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. रविवारी (दि. 19) त्यांनी काटेवाडी येथे भेट देऊन बिरोबा देवाचे दर्शन घेतले, तसेच देवस्थान परिसरातील सुरू असलेल्या आणि आगामी विकासकामांची सविस्तर माहिती घेतली.
या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी वनविभागाच्या अंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच भाविकांच्या सुविधांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बिरोबा देवस्थान परिसरात सातत्याने भाविकांची गर्दी असते. यात्रा काळात मोठ्या संख्येने परराज्यातील भाविक देखील येतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ स्वच्छतागृह, निवास व्यवस्था आणि अंतर्गत रस्त्यांची सुधारणा ही कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. देवस्थान परिसर स्वच्छ, आकर्षक आणि भक्तीमय वातावरणाने नटलेला असावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत.
वनविभागाच्या परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले असून पर्यटनस्थळ म्हणून या भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान परिसराचे आधुनिकीकरण, हरितीकरण आणि सौंदर्यवर्धनाची कामे करण्यात येतील. बिरोबा देवस्थानाचा कायापालट हा विकासदृष्ट्या आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
या वेळी बारामती-इंदापूर पालखी मार्गालगत असलेल्या पताका ओढा येथील हनुमान मंदिराच्या उभारणीसंबंधी पवार यांनी माहिती घेतली. या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, भाविकांच्या सोयी-सुविधांबाबत चर्चा केली.
याप्रसंगी उद्योजक शिवाजीराव काळे यांनी पवार यांचा फेटा बांधून आणि घोंगडी-काठी देऊन सत्कार केला. देवस्थान समितीच्या वतीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला. बिरोबा देवस्थान परिसरातील या विकास आराखड्यामुळे काटेवाडी आणि आसपासच्या गावांना नवचैतन्य मिळणार असून पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या हा भाग अधिक समृद्ध होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.