कारखाना उभा करण्यासाठी भाऊंनी अर्ध्याहून अधिक आयुष्य खर्च केले : हर्षवर्धन पाटील
कर्मयोगी कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार समारंभ संपन्न
कारखाना उभा करण्यासाठी भाऊंनी अर्ध्याहून अधिक आयुष्य खर्च केले : हर्षवर्धन पाटील
कर्मयोगी कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार समारंभ संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१- २०२६ करिता बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा बुधवारी ( दि.१३ ) जाहीर सत्कार समारंभ इंदापूर अर्बन बँक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गेल्या ३५ वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार पाहिले असून संघर्षातून सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले असल्याचे सांगितले.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी तसेच विविध संस्था, सभासद शेतकरी, गावपातळीवरील पदाधिकारी यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्मा भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी ज्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारी अर्ज माघे घेतले त्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने अनेक संघर्ष चढ-उतार पाहिले आहेत. भाऊंनी खाजगी असलेला हा कारखाना सहकारामध्ये आणला. कारखाना उभा करण्यासाठी अर्ध्याहून अधिक आयुष्य खर्च केले.कर्मयोगीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासद शेतकरी वर्गाने जो विश्वास दाखवून जे सहकार्य केले त्याबद्दल सभासद शेतकरी, स्वयंसेवी संस्था, संघटना, प्रादेशिक पक्ष या सर्वांचे आभार मानतो.सध्य परिस्थिती, कोरोना कालखंड लक्षात घेता आता अधिक जबाबदारी घेऊन,अधिक पटीने काम करून सभासद हितासाठी कारखानदारी चालवावी लागणार आहे. सर्व परिस्थितीतून मार्ग काढत सभासदाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.’
पद्मा भोसले म्हणाल्या की,’ नवनिर्वाचित संचालक मंडळाने सभासद, कामगारांचे हित जपावे. आर्थिक अडचणी असताना देखील अगोदरच्या संचालक मंडळाने जबाबदारीने सभासद हितासाठीचे कार्य केले आहे. कारखान्याच्या यशस्वीतेमध्येच सभासद शेतकरी, कामगार, ऊस वाहतूकदार यांचे हित आहे.’
अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की,’ राज्यातील अनेक कारखाने सद्यपरिस्थितीत अडचणीत आहेत तसेच ते मार्गक्रमण करीत आहेत. कर्मयोगी साखर कारखान्याची ही निवडणूक ३५ वर्षानंतर बिनविरोध होत असून या निमित्ताने आपण सर्व जण कारखान्याच्या हितासाठी एकत्रित आहोत.’
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव,भरत शहा, व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, ॲड.कृष्णाजी यादव, मारुतीराव वणवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील,निरा भिमा सह साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार,माऊली चवरे, शकिल सय्यद उपस्थित होते.प्रास्ताविक भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी केले.सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार नगरसेवक कैलास कदम यांनी मानले.