स्थानिक

काही शहरांमध्ये प्रशासनाची गॅस टंचाईमुळे धडक कारवाई – बारामतीत कधी होणार तपासणी?

गैरव्यवहार किंवा बनावट व्यवहार सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही शहरांमध्ये प्रशासनाची गॅस टंचाईमुळे धडक कारवाई – बारामतीत कधी होणार तपासणी?

गैरव्यवहार किंवा बनावट व्यवहार सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

बारामती वार्तापत्र 

जागतिक पातळीवरील तणावपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याचे पडसाद देशांतर्गत गॅस वितरण व्यवस्थेवर उमटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासनाने घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही शहरांमध्ये प्रशासनाने अवैध वापर आणि साठेबाजी रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम हाती घेतली असून, या कारवायांमुळे बारामतीतही तत्सम मोहिमेची मागणी जोर धरत आहे.

या मोहिमांतर्गत प्रशासनाने घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर होत असल्याचे उघड झाले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, भविष्यातही अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई सुरूच ठेवली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, नागरिकांमध्ये निर्माण होत असलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे घाबरून अनावश्यक साठेबाजी करू नये.

अतिरिक्त सिलेंडर बुकिंगमुळे वितरण व्यवस्थेवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत पुरवठा उशिरा पोहोचण्याची शक्यता वाढते. गॅस एजन्सींनाही पुरवठा सुरळीत व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर बारामतीतही अशाच प्रकारची तपासणी मोहीम राबवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून याबाबत अद्याप ठोस घोषणा करण्यात आलेली नसल्याने नागरिकांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

याचदरम्यान, बारामतीतील गॅस वितरण व्यवस्थेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने 16 सप्टेंबर 2025 रोजी शेवटचा सिलेंडर घेतल्याची नोंद अधिकृत पुस्तकात आहे. मात्र त्यानंतर कोणतीही नोंद नसतानाही संबंधित ग्राहकाच्या नावावर दर महिन्याला सिलेंडर उचलला जात असल्याचे ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेदरम्यान उघड झाले.

या प्रकारामुळे वितरण व्यवस्थेत गळती, गैरव्यवहार किंवा बनावट व्यवहार सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेमुळे प्रशासनाच्या देखरेखीतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, बारामतीत तातडीने व्यापक तपासणी मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलून पारदर्शकता, शिस्त आणि विश्वासार्हता निर्माण करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Back to top button