किरण गुजर यांचा खुलासा : “बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही नियोजित भेट नव्हती; कम्युनिकेशन गॅपमुळे गैरसमज”
“अजित दादांची अंतिम इच्छा ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशीच होती.

किरण गुजर यांचा खुलासा : “बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही नियोजित भेट नव्हती; कम्युनिकेशन गॅपमुळे गैरसमज”
“अजित दादांची अंतिम इच्छा ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशीच होती.
बारामती वार्तापत्र
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते किरण गुजर यांनी सविस्तर खुलासा केला आहे. माध्यमांतून पसरलेल्या बातम्यांमुळे गैरसमज निर्माण झाले असून, प्रत्यक्षात अशी कोणतीही नियोजित किंवा ठरलेली बैठक नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
किरण गुजरात म्हणाले की, “मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बारामतीत आलो होतो. अजित दादांचे स्मारक कुठे आणि कशा पद्धतीने उभारायचे, यासंदर्भात साहेबांशी चर्चा करण्यासाठी भेट झाली होती. त्या वेळी पवार कुटुंबातील काही सदस्य तिथे उपस्थित होते. मात्र, सर्वजण एका ठिकाणी एकत्र आले, यावरून लगेचच ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत’ अशी बातमी माध्यमांतून व्हिडीओसह प्रसारित झाली.”
ते पुढे म्हणाले की, “प्रत्यक्षात काल रात्रीपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत अशा प्रकारची कोणतीही चर्चा किंवा ठोस निर्णय झालेला नव्हता. मात्र, अजित दादांच्या दुःखद निधनानंतर पक्षाच्या वतीने काही शासकीय व पक्षीय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. या प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई पातळीवर सुरू केल्या होत्या. हा एक वेगळा विषय होता.”
माध्यमांमधून बातम्या आल्यावर अनेकांना या घडामोडींची माहिती केवळ मीडियातूनच मिळत होती. त्यामुळे काही प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या. “माझ्यासारख्या अनेकांना असे वाटले की यामध्ये कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे आणि तो स्पष्ट होणे गरजेचे आहे,” असेही गुजर यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, “दोन ते तीन दिवस संपूर्ण कुटुंब एकत्र असताना सर्व वातावरण सकारात्मक होते. मात्र, अचानक काही वेगळ्या चर्चा समोर आल्याने संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर पार्थ पवार तेथे आले. पार्थ पवार आणि संपूर्ण कुटुंबामध्ये एकत्र बसून सविस्तर चर्चा झाल्यानंतर जे काही गैरसमज होते, ते दूर झाले. कम्युनिकेशन गॅप संपला आणि सर्व विषय स्पष्ट झाले.”
या चर्चेनंतर एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला असल्याचे किरण गुजरात यांनी सांगितले. “अजित दादांची अंतिम इच्छा ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशीच होती. त्यांनी ती इच्छा विविध माध्यमांतूनही व्यक्त केली होती. ती पूर्ण करण्याची प्रक्रिया हा पुढील टप्प्याचा भाग आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याची प्रक्रिया ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)शी संबंधित असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हा वेगळा विषय असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. “आज जे घडते आहे, तो पहिला निर्णय आहे. त्यानंतर पुढे कसे जायचे, याचेही नियोजन केले जात आहे. सर्वजण सकारात्मक असताना अशा प्रकारच्या अफवा किंवा चर्चा होऊ नयेत, कारण त्यातून चुकीचा संदेश बाहेर जातो,” असे किरण गुजर यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “एकमेकांबद्दल मनात निर्माण झालेले थोडेफार गैरसमज आता पूर्णपणे दूर झाले असून, हा विषय आता संपलेला आहे.”






