कृषि उत्पन्न बजार समितीचे फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचा भूमीपूजन समारंभ उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते होणार
सुमारे 1100 कोटीची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

कृषि उत्पन्न बजार समितीचे फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचा भूमीपूजन समारंभ उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते होणार
सुमारे 1100 कोटीची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचेवतीने उभारण्यात येणाऱ्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या हाताळणी सुविधा केंद्राचे भूमीपूजन बारामती कृषि उत्पन्न बजार समितीचे उपबाजार जळोची येथे दि. 28 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मंत्री सहकार व पणन बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री पणन शंभूराजे देसाई, प्रधान सचिव सहकार व पणन अनुप कुमार, कार्यकारी संचालक,महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे सुनिल पवार, सरव्यवस्थापक कृषि पणन मंडळ तथा प्रकल्प संचालक मॅग्नेट प्रकल्प दिपक शिंदे, सभापती बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती वसंत गावडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील डाळींब, केळी , संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल) व फुलपिके इत्यादी फलोत्पादन पिकांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मुल्य साखळ्यांचा विकास विचारात घेवून शासन निर्णयान्वये राज्यात आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत, महाराष्ट्र ॲग्री बिझनेट नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. या प्रकल्पात अंतर्भूत विविध घटक जसे शेतकरी उत्पादक संस्थांचा क्षमता विकास, मुल्यसाखळी निर्माण करण्यासाठी अर्थसहाय्य देणे या घटकांचा समावेश असून निवड केलेल्या पिकांच्या मुल्यसाखळी विकासाचे अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या सुविधांचे विस्तारीकरण /आधुनिकीकरण करणे व नविन सुविधांची उभारणी करणेचा समावेश आहे.
मॅग्नेट प्रकल्पाव्दारे महाराष्ट्रामध्ये सुमारे 1100 कोटीची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये अस्तित्वात असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्था (FPOs),निर्यातदार, प्रक्रीयादार, संघटीत किरकोळ विक्रेते, कृषि व्यवसाय करणारे लघु व मध्यम उद्योजक, वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समूह यांच्या सहभागातून निवडण्यात आलेल्या फलोत्पादन पिकांचे उत्पादन, उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे, काढणी पश्चात होणारे नुकसान कमी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून या सुविधा केंद्राचे उभारणीअंती राज्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी केले आहे