कृषी विधेयकावर राष्ट्रवादी आक्रमक; २५ सप्टेंबरच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा.
कृषी विधेयकावर राष्ट्रवादी आक्रमक; २५ सप्टेंबरच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा.
कृषी विधेयकांवरून संतप्त प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी विधेयकाविरोधात २५ सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनात राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईः बारामती वार्तापत्र रिपोर्ट.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुचर्चित कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. देशव्यापी किसान संघर्ष समितीनं २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना झालेल्या गोंधळावर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून केंद्रावर टीका केली असून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनालाही पाठिंबा दर्शवला आहे. नव्या शेती कायद्यामागचा हेतू वाईट नसला तरी केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याचं मत त्यांनी या वेळी व्यक्त केलं. त्यातबरोबर कांदा निर्यातीवरही त्यांनी लक्ष वेधलं. एकीकडे तुम्ही बाजारपेठ खुली करता, मग कांदा निर्यातीवर बंदी का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यासभेत यापूर्वी जे घडलं नाही ते पाहायला मिळालं. राज्यसभेत कृषी विधेयकं येणार होती यांवर दोन-तीन दिवस चर्चा अपेक्षित असते. मात्र, ही विधेयकं तातडीने मंजूर व्हावी अशी सत्ताधारी पक्षाची भूमिका होती. सदस्यांना प्रश्न होते, चर्चा करण्याचा आग्रह होता. पण तरीही सभागृहाचे काम पुढे रेटून नेण्याचं दिसतं होतं, असंही शरद पवार म्हणाले.