कृषी विधेयक व कामगाराच्या कायद्या विरोधात बारामतीत निदर्शने
कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी

कृषी विधेयक व कामगाराच्या कायद्या विरोधात बारामतीत निदर्शने
कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी
बारामती वार्तापत्र
केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी (दि. २७) भारत बंद ची घोषणा केली आहे. या बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. दरम्यान बारामतीत प्रशासकीय भवन येथे बारामती एमआयडीसीतील कामगार संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन कार्पोरेट धार्जिणे शेतीविषयक कायदे तात्काळ रद्द करावेत, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा विचार करून किमान हमी भाव देणारा कायदा करावा, नुकत्याच केलेल्या कामगार कायदा मधील कामगार विरोधी बदलाच्या चार श्रम
संहिता रद्द कराव्यात, कामगार कायद्यांमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी सर्व कामगार संघटनांशी खुला विचारविनिमय करावा व
प्रचलित कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी या मागण्यांसाठी देशव्यापी
भारत बंदमध्ये बारामती एमआयडीसीतील कामगार संघटनांनी देखील भाग घेतला आहे.
बारामतीतील ग्रीव्हज कॉटन अँड कंपनी एम्प्लॉईज युनियन, पियाजिओ व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेड, पुना एम्प्लॉइज युनियन, त्रयामुर्ती इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड बारामती व बेलमोन्ट स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर, भारतीय कामगार सेनेच्या सुयश ऑटो
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी यामध्ये सहभाग घेतला.