केळी व सूर्यफूल पीक लागवडीकरिता तंत्रज्ञानाचा वापराबाबत कृषी विभागाचे आवाहन
विक्री व्यवस्था विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न

केळी व सूर्यफूल पीक लागवडीकरिता तंत्रज्ञानाचा वापराबाबत कृषी विभागाचे आवाहन
विक्री व्यवस्था विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न
बारामती वार्तापत्र
‘दिशा कृषी उन्नतीची-२०२९’ अंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी केळी उत्पादन पद्धती व निर्यात तसेच सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान मास्टर ट्रेनर प्रशिक्षणाअंतर्गत क्षेत्र वाढ, उत्पादन तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आदर्श केळी उत्पादन पद्धती व निर्यात तसेच सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान मास्टर ट्रेनर प्रशिक्षण अंतर्गत क्षेत्र वाढ, उत्पादन तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्था विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले.
यावेळी जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरुण भोसले, प्रगतशील शेतकरी तथा केळी रत्न कपिल जाचक, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष करंजे, बारामती ॲग्रो स्टार शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक योगेश खोमणे, ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक अमित भोसले, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
श्री. हाके म्हणाले, या दोन दिवसीय प्रशिक्षणांमध्ये शेतकऱ्यांना केळी उत्पादन पद्धती व निर्यात तसेच सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान मास्टर ट्रेनर प्रशिक्षण अंतर्गत क्षेत्र वाढ, उत्पादन तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करुन लागवड ते प्रक्रिया या हेतूनुसार उत्पादन वाढीसाठी काय करावे याबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ.अरुण यांनी तंत्रशुद्ध केळी लागवड तंत्रज्ञान व किड रोग व्यवस्थापन विषयी तर श्री.जाचक यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी वापरण्यात येणारी अवजारे कृषी निविष्ठा, बागेत काम करताना घ्यावयाची काळजी तसेच निर्यात करण्याच्याअनुषंगाने माहिती दिली. श्री. करंजे यांनी तंत्रशुद्ध सूर्यफूल लागवडीबाबत तसेच वैभव कुडाळे यांनी सूर्यफुलाच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानानंतर लाकडी तेल घाण्याद्वारे तेल निर्मिती आणि त्या शासकीय योजना अनुदानाविषयी माहिती दिली.