स्थानिक

फेरेरो मध्ये ‘निधी आपके निकट ‘ संपन्न

भविष्य निर्वाह निधी बाबत तज्ञांचे मार्गदर्शन

फेरेरो मध्ये ‘निधी आपके निकट ‘ संपन्न

भविष्य निर्वाह निधी बाबत तज्ञांचे मार्गदर्शन

बारामती वार्तापत्र 

गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पुणे, विमान नगर प्रादेशिक कार्यालयाने फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी बारामती येथे ‘निधी आपके निकट २.०’या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमात भविष्य निर्वाह निधी सदस्यांना आणि नियोक्त्यांना ईपीएफओ योजनांमधील फायदे, नवीन योजना ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना कर्मचारी नोंदणी मोहीम, २०२५ आणि श्रम संहिता याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रसंगी पी .एफ. इनफोर्समेंट अधिकारी एन. रमेश, फेरेरोचे इंडस्ट्रियल रिलेशन अधिकारी योगेश मुगदुम, फेरेरो कर्मचारी इम्प्लॉईज युनियन अध्यक्ष बाळासाहेब डेरे,कार्याध्यक्ष सचिन गवळी, सचिव महेश लकडे, सदस्य महादेव गोसावी व बारामती परिसरातील विविध कंपन्याचे अधिकारी उपस्तीत होते.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार अंमलबजावणी ही योजना लागू करण्याची जबाबदारी ईपीएफओकडे सोपवण्यात आली आहे.

१ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ पर्यंत,कर्मचारी लाभ घेऊ शकतात, नवीन कर्मचारी, ज्यांचे मासिक उत्पन्न १ लाख पर्यंत आहे आणि जे प्रथमच ईपीएफओमध्ये नोंदणी करत आहेत, त्यांना १५,००० पर्यंत रोख प्रोत्साहन मिळेल.

ही रक्कम ६ आणि १२ महिन्यांच्या सततच्या नोकरीनंतर दोन हप्त्यांमध्ये त्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

प्रथमच ईपीएफमध्ये नोंदणी करणारे आणि पुन्हा सामील होणारे कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्या नियोक्त्यांना दोन वर्षांसाठी प्रति कर्मचारी दरमहा ₹ ३,००० पर्यंत प्रोत्साहन मिळेल.

उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांसाठी हा लाभ चार वर्षांसाठी उपलब्ध असेल. प्रोत्साहन रक्कम नियोक्त्यांच्या पॅन-लिंक्ड बँक खात्यात जमा केली जाईल.

कर्मचारी नोंदणी मोहीम, २०२५ ही मोहीम १ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झाली असून, ती केवळ सहा महिन्यांसाठी म्हणजेच ३० एप्रिल २०२६ पर्यंत चालेल. जे कर्मचारी १ जुलै २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या काळात कामावर रुजू झाले परंतु काही कारणास्तव ईपीएफ योजनेत सामील होऊ शकले नाहीत, त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल.

या योजनेमुळे ज्या कंपन्यांनी पूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांची ईपीएफमध्ये नोंदणी केली नव्हती, त्यांना लाभ मिळेल. या कर्मचाऱ्यांसाठी फक्त नियोक्त्याचे अंशदान जमा करून आणि किमान दंड भरून अनुपालन पूर्ण करता येत असल्याची माहिती
पी एफ चे इन्फॉर्समेंट ऑफिसर एन रमेश यांनी दिली.

सदर योजना प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची असून प्रत्येकाने लाभ घेण्याचे आवाहन फेरेरो कर्मचारी संघटना अध्यक्ष बाळासाहेब डेरे यांनी सांगितले.

Back to top button