कोरोनावर मात करून परतलेल्या कुटुंबाचे ग्रामस्थांकडून तोफांची सलामी देत जंगी स्वागत
उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा देखील केला मानसन्मान
कोरोनावर मात करून परतलेल्या कुटुंबाचे ग्रामस्थांकडून तोफांची सलामी देत जंगी स्वागत
उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा देखील केला मानसन्मान
इंदापूर:प्रतिनिधी
अनुक्रमे ८५ व ८३ वर्षे वयाच्या वयोवृध्द दांपत्यासह एकाच कुटुंबातील सहा जणांनी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वीरित्या मात करुन आत्मबलाच्या जोरावर जीवावरच्या संकटावर देखील मात करता येते,याचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.या संकटातून त्यांची सुटका झाल्याबद्दल ग्रामस्थांनी ही त्यांचे तोफांची सलामी देत जंगी स्वागत केले.
सविस्तर हकीकत अशी की, इंदापूर शहरानजीक असणाऱ्या म्हेत्रेवस्ती मधील बाळासाहेब म्हेत्रे व त्यांच्या कुटुंबातील इतर पाच जणांना पंधरवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.म्हेत्रे यांचे ८५ वर्षे वयाचे वडील व ८३ वर्षे वयाची आई यांचा त्यामध्ये समावेश होता.हे काळजीचे मुख्य कारण होते.या सर्वांवर शहरातील लाईफ केअर अँड आय.सी. यू.सेंटरमध्ये डाॅ.अमोल रासकर,डाॅ.मनोज वाघमोडे यांनी उपचार केले.म्हेत्रे यांच्या आई वडीलांसह सर्वांनीच उपचारांना उत्तम साथ दिली. सर्वजण कोरोनामुक्त झाले.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे,डाॅ.सुहास शेळके, डाॅ.अमोल रासकर,डाॅ.अमोल शेंडे,डाॅ.नामदेव गार्डे,कर्मयोगी सहकारीचे संचालक अतुल व्यवहारे,संदीप दोशी,माजी संचालक सतीश व्यवहारे,सागर सूर्यवंशी,दीपक रायकर,सागर व्यवहारे,केदार पेटकर,गोपाळ म्हेत्रे,संजय गार्डी,विलास गडदे, बापू घोगरे,संतोष निगडे यांच्यासह म्हेत्रेवस्ती व माळवाडीमधील शुभचिंतकांच्या उपस्थितीत या सर्वांना त्यांच्या घरी सोडण्यात आले.
या वेळी बोलताना उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे म्हणाले की,देशातून कोरोना अद्याप हद्दपार झाला नाही.म्हेत्रे कुटुंबातील वयोवृध्दांनी धाडसाने कोरोनाशी यशस्वी मुकाबला केला आहे.मात्र प्रत्येकाच्या घरात वयोवृद्ध असतात.कुटुंबप्रमुख दिवसभर घराबाहेर असतात. त्यांनी ही आपल्यामुळे घरातील लोकांना कोरोनासारख्या रोगाचा त्रास होवू नये यांची काळजी घेतली पाहिजे.
डाॅ.अमोल रासकर म्हणाले की,इच्छाशक्तीच्या जोरावर म्हेत्रे कुटुंबाने कोरोनावर मात केली आहे.त्यांच्यावर उपचार करण्याच्या निमित्ताने आम्ही ही
काही नवीन गोष्टी शिकलो.सध्या इंदापूर शहर परिसरातील लोकांचा मास्कविना होत असणारा संचार ही काळजीची बाब आहे.कोरोना गेला हा गैरसमज कोणी ही करुन घेवू नये.शासनाने घालून दिलेले सर्व नियम कटाक्षाने पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
डाॅ.सुहास शेळके,डाॅ.नामदेव गार्डे,डाॅ.अमोल शेंडे आदिंनी मनोगत व्यक्त केले.सतीश
व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
बाळासाहेब म्हेत्रे म्हणाले की, कोरोना हा आजार गंभीर नाही. त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.खचू नका मनोबल वाढवा,आपण कोरोनावर नक्की मात करु शकतो.समाजाने देखील कोरोना झालेल्या रुग्णाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.त्यास मानसिक आधार द्यावा.कोरोनावर मात करु शकतो असा आम्हा सर्वांना विश्वास होता.त्यास योग्य उपचाराच्या रुपाने डाॅक्टरांची साथ मिळाली.लढा यशस्वी झाला.