कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा आपलं डोकं वर काढू शकतो!, ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी तर फ्रान्समध्ये पाचवी लाटेने दहशत निर्माण
रुग्णसंख्या जास्त असली तरी गंभीर रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे.
कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा आपलं डोकं वर काढू शकतो!, ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी तर फ्रान्समध्ये पाचवी लाटेने दहशत निर्माण
रुग्णसंख्या जास्त असली तरी गंभीर रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे.
प्रतिनिधी
दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत कोट्यवधी नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, अनेकांनी जीवदेखील गमावले आहेत. चीनमधून सुरू झालेला कोरोनाचा कहर संपूर्ण जगभर पसरला होता. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना जगातल्या मोठमोठ्या देशांचेदेखील प्रचंड हाल झाले होते. दरम्यानच्या काळात संशोधकांना कोरोनाची लस तयार करण्यात यश आलं. सध्या जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. त्यामुळं कोरोनाची तीव्रता काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे.
भारतामध्येदेखील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे. प्रसाराची तीव्रता कमी झाली असली, तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मात्र लस घेतल्यानंतर नागरिकांचा निष्काळजीपणा वाढताना दिसत आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असून, सुरक्षिततेच्या कुठल्याही नियमांचं ते पालन करत नाहीत, असं दिसत आहे. भारतामध्ये तिसरी लाट येणारच नाही, अशा आविर्भावामध्ये नागरिक बिनधास्त वावरत आहेत. ही गोष्ट जीवघेणी ठरू शकते, हे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा आपलं डोकं वर काढू शकतो, याची प्रचिती सध्या ब्रिटन आणि फ्रान्स हे देश घेत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या आणि फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने दहशत निर्माण केली आहे.
ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी झपाट्यानं लसीकरण केलं आहे. त्यामुळे संसर्गग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी फायदा होत आहे. रुग्णसंख्या जास्त असली तरी गंभीर रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे. फ्रान्समध्ये सध्या 1076 रुग्ण आयसीयूमध्ये, तर 6702 रुग्ण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. ब्रिटनमध्ये सध्या 9000 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 1022 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. लसीकरण झाल्यामुळे कोरोना संसर्गाचा रुग्णांवर गंभीर परिणाम होत नाही.
फ्रान्स आणि ब्रिटनमधली एकूण परिस्थिती लक्षात घेता भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांनी अधिक काळजी घेणं अपेक्षित आहे. कारण, युरोपीयन देशांमध्ये सध्या पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा स्ट्रेन जास्त घातक असल्याचं समोर आलं आहे. भारतामध्ये तिसरी लाट आली तर मोठा गोंधळ उडण्याची भीती वर्तवली जात आहे.