
विहिरीतील मगर बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश
मगरीला कात्रज उद्यानात सोडले
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे भावडी गावातील शेतकरी श्री.शिपकुले यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी (दि.१) दुपारी आढळून आलेली मगर मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात वन विभाग व भुगाव येथील बचाव पथकास अखेर यश आलं आहे.
शेतकरी श्री.शिपकुले यांच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू करताना दुपारच्या सुमारास मगर दिसून आल्याने शेतकरी शिपकुले यांनी त्वरित वन विभागाला तातडीने माहिती दिली.माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीत पाणी मोटारीच्या साहाय्याने काढण्याचं काम चालू केलं. त्याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील भुगाव येथून रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाली.रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बचाव पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मगरीला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभाग व रेस्क्यू टीमला यश आले असून मगरीला पुणे येथील कात्रज उद्यानात सोडण्यात आले असल्याची माहिती संबधीत अधिकाऱ्यांनी दिली आहे.