खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांची उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी
बैठकीत निवडणूक आचारसंहिता व एकूण निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यात आला

खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांची उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी
बैठकीत निवडणूक आचारसंहिता व एकूण निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यात आला
बारामती वार्तापत्र
आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांनी उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी आज पार पाडली.
या पोटनिवडणुकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, निवडणूक कालावधीत त्यांच्या खर्चाची एकूण तीन वेळा तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिली तपासणी १३ एप्रिल रोजी पूर्ण झाली असून, दुसरी तपासणी १७ एप्रिल रोजी आणि तिसरी तपासणी २१ एप्रिल रोजी होणार आहे.
आज झालेल्या पहिल्या तपासणीवेळी २३ पैकी २२ उमेदवारांनी आतापर्यंतचा दैनंदिन निवडणूक खर्च अहवाल खर्च निरीक्षकांकडे सादर केला. खर्चाच्या नोंदींची सविस्तर पडताळणी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक सुरेंद्र वाघमारे, संजय शेलार, खर्च पथक प्रमुख तुषार मोरे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे आणि किशोर माने तसेच व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT) प्रमुख श्री. लोखंडे आणि इतर खर्च पथकातील सदस्य उपस्थित होते. निरीक्षक रामनाईक यांनी अकाऊंटिंग, व्हीव्हीटी आणि व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम (VST) पथकांना आवश्यक सूचना दिल्या. सर्व उमेदवारांच्या राजकीय सभा, प्रचार कार्यक्रम आणि संबंधित खर्चाची अचूक नोंद ठेवण्याचे तसेच कोणताही खर्च निवडणूक खर्चाच्या कक्षेबाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच यावेळी सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक आचारसंहिता व एकूण निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत पारदर्शक व निर्भीड निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या.






