खळबळजनक ! बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी साजरा केला कार्यक्रम ,,नागरिकांमधून संताप
बारामतीतील हे हॉस्पिटल कायमच चर्चेत असते

खळबळजनक ! बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी साजरा केला कार्यक्रम ,,नागरिकांमधून संताप
बारामतीतील हे हॉस्पिटल कायमच चर्चेत असते
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतानाच बारामतीत देखील गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिकच वाढत आहे.त्यातच शासनाचे नियम धाब्यावर बसवून बारामतीतील काही सुशिक्षित व जबाबदार मंडळींनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसह कार्यक्रम साजरा केला आहे.सदरील कार्यक्रमाचे फोटो सर्वत्र वायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली असून या कृत्यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याकारणाने प्रशासनाने अनेक धार्मिक तसेच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातलेली असताना देखील येथील बारामती हॉस्पिटलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये बारामतीतील अनेक नामांकित, प्रतिष्ठीत ,राजकीय तसेच आरोग्य क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
मात्र कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या मंडळीनी कोरोना पॉझिटिव्ह असून देखील केलेल्या कार्यक्रमामुळे बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सदरील कार्यक्रमामध्ये बारामती हॉस्पिटलचा स्टाफ त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आला आहे का ? अन् जर आला असल्यास तेथील रुग्णांसह अन्य नागरिकांच्या आरोग्याचा किती मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अशा नावाजलेल्या हॉस्पिटलने प्रशासनाचे सर्व आदेश व नियम धाब्यावर बसवणे कितपत योग्य आहे.
दरम्यान मागील काही दिवसापूर्वी सिल्वर जुबली हॉस्पिटल मध्ये एका व्यक्तीने रुग्णालयात डान्स केला होता. त्यामुळे त्या व्यक्तीवर प्रशासनाने कारवाई केली होती. मात्र आता खुद्द एका खाजगी रुग्णालय प्रशासनाने अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन हलगर्जीपणा केल्याने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे त्यांच्यावर कारवाई करणार का? अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.
बारामतीतील हे हॉस्पिटल नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते.या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या उच्च दर्जाच्या सुविधेमुळे मोठमोठे लोक सुद्धा हॉस्पिटलकडे उपचार घेण्यासाठी जात असतात. मात्र रुग्णांना येणारी बिले हासुद्धा येथील रुग्णालयाच्या चर्चेचा विषय ठरत असतो.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येविषयीही रुग्णालयाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामध्ये आता शासनाच्या आदेशाचा भंग करून केलेल्या कार्यक्रमाची अधिकची भरच पडली आहे.
समाजातील सुशिक्षित म्हणवणाऱ्यांनीच जर अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन प्रशासनाच्या आदेशाला हरताळ फासलेने आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.