गळीतधान्य व तेलताड अभियान अंतर्गत निरावागज येथे सोयाबीन बियाणाचे वाटप
गावाच्यावतीने त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच

गळीतधान्य व तेलताड अभियान अंतर्गत निरावागज येथे सोयाबीन बियाणाचे वाटप
गावाच्यावतीने त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच
बारामती वार्तापत्र
मौजे निरावागज येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 गळीतधान्य व तेलताड अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत सोयाबीन बियाणांचे वाटप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासनाना देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.
गळीतधान्य व तेलताड अभियाना अंतर्गत मौजे निरावागज येथील चैतन्य शेतकरी बचत गट, शरद सेंद्रिय शेतकरी बचत गट व वाघेश्वरी शेतकरी बचत गट यांनी कृषि विभागाच्या महाडीटीबी पोर्टलवर बियाणे वितरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरलेले होते. त्याप्रमाणे त्यांची लॉटरी पध्दतीने निवड झाल्याने वरील गटांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले.
बियाणे वाटपावेळी शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या महाडीटीबी पोर्टलवर वेळच्यावेळी वेगवेगळ्या योजने करीता अर्ज भरून लाभ घेण्याचे व सोयाबीन उगवणी करीता पुरेशी ओल आल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन देवकाते यांनी केले. तसेच निरावागज येथील कृषि सहायक श्रीमती ज्योती गाढवे ह्या आमच्या गावास नेहमी निस्वार्थी भावनेतून गावाच्या विकासासाठी अधिकाधिक योजना देवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर उंचवण्याकरीता प्रयत्न करतात. त्यामुळे गावाच्यावतीने त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असेही , ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमासाठी नामदेव मदने (गुरूजी), ज्ञानदेव देवकाते, हरिश्चंद्र धायगुडे, सौ. शितल धायगुडे, ग्रामपंचायत सदस्या व वरील गटातील सदस्य शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मंडल कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कृषि सहायक श्रीमती गाढवे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मदने गुरूजी यांनी आभार मानले.