गागरगावमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी,8 लाख 90 हजार रुपये किमतींचा ऐवज लंपास
दुपारच्या सुमारास 2 ठिकाणी घरफोडीची घटना

गागरगावमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी,8 लाख 90 हजार रुपये किमतींचा ऐवज लंपास
दुपारच्या सुमारास 2 ठिकाणी घरफोडीची घटना
इंदापूर प्रतिनिधी –
गागरगाव (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि.10) जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास 2 ठिकाणी घरफोडीची घटना घडली. यामध्ये अज्ञात चोरट्याने दोन मजली बंगल्यात राहत असलेल्या दोन सख्या बंधूंच्या घरातून मिळून 6 लाख 90 हजार रुपयांच्या 11.30 तोळे वजनाच्या दागिन्यांसह 2 लाख रुपये यांची रोकड असा तब्बल 8 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या संदर्भात नवनाथ अर्जुन कचरे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. इंदापूर पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय.
याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास नवनाथ कचरे नेहमीप्रमाणे एस. बी. पाटील विद्यालय गागरगाव येथील कॅन्टीनमध्ये गेले. याच वेळी त्यांच्या पत्नी उषा या देखील कारखाना चौक येथील, कापड दुकानात जाताना घराला कुलूप लावून गेल्या. तर नवनाथ कचरे यांचा भाऊ
व भावजय हे शेतात गेले. शिवाय आई दुपारी दवाखान्यात गेली होती. यामुळे सहाजिकच घरी कोणीही नव्हते. त्यावेळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी कोयंडा तोडून फिर्यादीचा भाऊ राहुल कचरे याच्या घरातील 4.30 तोळे वजनाचे दागिने व रोख रक्कम 50 हजार, असा एकूण 3 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. त्याचबरोबर फिर्यादीच्या घरातील 7 तोळे वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 1 लाख 50 हजार, असा एकूण 5 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून लंपास केला. या दोन्ही कचरे बंधूंच्या घरी झालेल्या चोरीमध्ये एकूण 8 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस करत आहेत.