शैक्षणिक

गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दिशा — “मा. खा. शरदचंद्रजी पवार शिष्यवृत्ती योजना”

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये

गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दिशा — “मा. खा. शरदचंद्रजी पवार शिष्यवृत्ती योजना”

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील माळेगाव बु. येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळात शिक्षण घेणाऱ्या गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक उपक्रम राबविण्यात आला आहे. Sharadchandra Pawar यांच्या मार्गदर्शनाखाली “पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट” मार्फत “मा. श्री शरदचंद्र पवार शिष्यवृत्ती योजना” जाहीर करण्यात आली असून या योजनेमुळे शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना नवी आशा मिळाली आहे.

या शिष्यवृत्ती योजनेच्या निवड समितीत सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त सदस्यांचा समावेश करण्यात आला असून कृषिभूषण प्रल्हाद वरे, गौरव जाधव, प्रवीण पोंदकुले आणि सचिव डॉ. धनंजय ठोंबरे सर यांच्यावर निवड प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आज पार पडलेल्या मुलाखतींमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी आणि व्यवस्थापन विभागातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील ध्येय यांचा सखोल विचार करून पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळ गुणांच्या आधारे नव्हे, तर विद्यार्थ्यांची जिद्द, संघर्षशीलता आणि परिस्थिती लक्षात घेऊन शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्याची आणि पुढे जाण्याची मोठी संधी मिळाली आहे.
शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबण्याची भीती निर्माण झाली होती, मात्र या उपक्रमामुळे आमची स्वप्ने साकार होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, हा पवार चॅरिटेबल ट्रस्टचा स्पष्ट व मुख्य उद्देश असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक शुल्कात मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
मुलाखतीदरम्यान घडलेला एक प्रसंग विशेष लक्षवेधी ठरला. कर्जत जामखेड तालुक्यातील काही विद्यार्थ्यांना विचारण्यात आले की? ही शिष्यवृत्ती कोणामार्फत मिळत आहे, त्यावर त्यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले की कर्जत-जामखेडचे आमदार Rohit Pawar यांचे आजोबा Sharadchandra Pawar यांच्या माध्यमातून ही मदत मिळत आहे. या उत्तरातून विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल असलेली जागरूकता आणि विश्वास स्पष्टपणे दिसून आला.
या कार्यक्रमाला विविध विभागांचे प्राचार्य व मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये प्रा. आर. बी. जाधव (फार्मसी), डॉ. शैलेंद्र मुकणे, डॉ.संदीप शहा (डिप्लोमा), प्रा ए एम कोकरे,
प्रा.पुरुषोत्तम पवार, प्रा. राजेंद्र बांदल,प्रा.संदिप ताटे तसेच इतर अधिकारी यांचा समावेश होता. एकूणच “शरदचंद्र पवार शिष्यवृत्ती योजना” हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज सशक्त करण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरत आहे.

Back to top button