स्थानिक

गुणवडी रोड परिसर दुर्गंधीने ग्रस्त; नगरपालिकेने कडक पावले उचलून कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची गरज

प्लास्टिक पिशव्या, अन्नाचा उरलेला कचरा

गुणवडी रोड परिसर दुर्गंधीने ग्रस्त; नगरपालिकेने कडक पावले उचलून कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची गरज

प्लास्टिक पिशव्या, अन्नाचा उरलेला कचरा

बारामती वार्तापत्र

शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ व सुंदर बारामतीसाठी प्रयत्न सुरू असतानाच काही बेजबाबदार नागरिकांमुळे या प्रयत्नांना गालबोट लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. बारामती नगरपालिका हद्दीतील गुणवडी रोड परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुणवडी रोडवरील मोकळ्या जागांमध्ये व रस्त्याच्या कडेला घरगुती तसेच व्यावसायिक कचरा सर्रास टाकला जात आहे. प्लास्टिक पिशव्या, अन्नाचा उरलेला कचरा, बांधकाम साहित्याचे अवशेष आणि इतर घनकचरा यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला असून प्रवाशांना नाक दाबून जावे लागत आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळ या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असल्या तरी काही जण मुद्दामहून रात्रीच्या वेळी किंवा पहाटे कचरा टाकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वच्छतेसाठी केलेले प्रयत्न वाया जात आहेत. कचऱ्यामुळे डास, माश्या वाढण्याचा धोका निर्माण झाला असून आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कचरा टाकणाऱ्यांविरोधात जनजागृती मोहीम राबवून ‘स्वच्छ बारामती’ उपक्रमाला नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, स्वच्छतेसाठी प्रशासन आणि नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत असून, गुणवडी रोड परिसरातील कचऱ्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button