क्राईम रिपोर्ट

गुन्हेगारांना इशारा;बारामतीतल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी

एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी जेल; बारामती तालुका पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा_

गुन्हेगारांना इशारा;बारामतीतल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी

एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी जेल; बारामती तालुका पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा_

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका पोलीस ठाण्याने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर कठोर पाऊल उचलत त्याच्यावर एमपीडीए कायदा १९८१ अंतर्गत कारवाई केली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करूनही सुधारणा न दाखवणाऱ्या आरोपीला थेट नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी (ता. बारामती) येथील सुरेंद्र रवींद्र काजळे याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण तसेच बारामती परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरोडा, दुखापत, गंभीर दुखापत, विनयभंग व फसवणूक अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्हेगारी प्रवृत्ती कायम ठेवत पुन्हा नव्याने गुन्हे करण्याचा क्रम सुरूच असल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (MPDA) अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला.

हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला. सर्व कागदपत्रांची छाननी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलिसांनी तात्काळ अंमलबजावणी करत आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलविले. बारामती तालुका पोलिसांच्या या निर्णायक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार पोलीस अंमलदार महेश बनकर स्थानिक गुन्हे शाखा आणि सागर देशमाने विकास खाडे बारामती तालुका पोलीस ठाणे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

चौकट:१

‘बारामती विभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका ठाम आणि कठोर आहे. रेकॉर्डवरील तसेच सराईत गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर एमपीडीएसारख्या कठोर कायद्यांखाली थेट कारवाई होईल’.

~गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक

चौकट:२

‘बारामती उपविभागात शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर विशेष नजर ठेवून कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल.सामान्य नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड होणार नाही..’

~सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी

चौकट:३

‘जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर विशेष भर देण्यात येत आहे. २०२५ आणि २०२६ या कालावधीत आतापर्यंत १६ गुंडांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. कायद्याचा धाक निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांना वेळीच इशारा देणे आणि आवश्यकतेनुसार कठोर पावले उचलणे याबाबत पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे.’
~संदिपसिंह गिल, पोलीस अधीक्षक

Back to top button