
गॅंगस्टर निलेश घायवळला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
येरवडा कारागृहात केली रवानगी
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि भिगवण पोलिसांनी संयुक्त पणे कारवाई करत गॅंगस्टर निलेश घायवळ याला सोनेगाव ( ता . जामखेड ) या ठिकाणावरून ताब्यात घेत त्याची रवानगी थेट येरवडा कारागृहात केली आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे,भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने आदींच्या पथकाने केली.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निलेश घायवळ याला एम,पी.डी.ए कायद्यांतर्गत पुढील एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
घायवळ याच्यावर डिसेंबर २०२० मध्ये भिगवण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल होता. याशिवाय घायवळ याच्याविरुद्ध मोक्का, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी तसेच इतर गंभीर स्वरूपाचे दहा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.