आपला जिल्हा

गोविंदांच्या थराराने इंदापूर दुमदुमले; लोकनियुक्त नगराध्यक्ष भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

महिलांचे ढोल-ताशा पथक ठरले लक्षवेधी

गोविंदांच्या थराराने इंदापूर दुमदुमले; लोकनियुक्त नगराध्यक्ष भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

महिलांचे ढोल-ताशा पथक ठरले लक्षवेधी

इंदापूर,  –

ढोल-ताशांचा कडकडाट… गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार… ‘गोपालकृष्ण महाराज की जय’चा जयघोष आणि त्याला मिळालेली नागरिकांची उत्स्फूर्त दाद, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात इंदापूर शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. FOLK आख्यान, पारंपरिक वाद्ये आणि महिलांच्या ढोल-ताशा पथकाच्या दमदार सादरीकरणामुळे उत्सवाला विशेष रंगत आली.

शहरातील जुना बाजार समितीच्या परिसरात सोमवारी (ता. ७) हा दहीहंडी सोहळा पार पडला. दहीहंडीच्या माध्यमातून मराठी संस्कृती, लोककला आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. फोक आख्यानातून मनोरंजनासोबतच लोकप्रबोधन करण्यात आले. ढोल-ताशांच्या निनादाने परिसर भारावून गेला, तर तरुणाईने उत्साहात सहभाग घेतला.यावेळी महात्मा फुले दहीहंडी संघ, शिवशंभो दहीहंडी संघ, स्वराज्य ग्रुप दहीहंडी संघ यांनी मानवी मनोऱ्यातून सलामी दिली.तर महात्मा फुले दहीहंडी संघाने चित्तथरारक सहा मानवी  मनोरे रचत दहीहंडी फोडत विजेतेपद मिळवले.

मानवी मनोऱ्यांनी वेधले लक्ष

महात्मा फुले दहीहंडी संघाने सादर केलेल्या मानवी मनोऱ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. थरावर थर रचत गोविंदांनी दहीहंडीपर्यंत मजल मारली. अखेर दहीहंडी फोडताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. गोविंदांच्या या थरारक कामगिरीने उत्सवाची रंगत आणखी वाढली.

या कार्यक्रमास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, अविनाश घोलप,मधुकर भरणे, प्रशांत पाटील,वसंतराव मोहोळकर, देवराज जाधव, मयूर पाटील, मुकुंद शहा, शिवाजी मखरे,माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्यासह नगरपरिषदेचे नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.तसेच सर्व उपस्थितांचे आभार युवा उद्योजक अंगद शहा यांनी मानले.

अजित पवारांच्या आठवणींना उजाळा

कार्यक्रमादरम्यान दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,आप्पासाहेब जगदाळे व भरत शहा यांच्या मनोगतातून त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी काही काळ विद्युत दिवे बंद करून मोबाईलच्या प्रकाशात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात या प्रसंगामुळे काही क्षण भावनिक वातावरण निर्माण झाले.

महिलांचे ढोल-ताशा पथक ठरले लक्षवेधी

दहीहंडी सोहळ्यात हिरकणी ग्रुपच्या महिलांच्या ढोल-ताशा पथकाने विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या तालावर दमदार सादरीकरण करत पथकाने वातावरणात उत्साह भरला. ढोल-ताशांचा निनाद आणि त्याला मिळालेली नागरिकांची उत्स्फूर्त दाद यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. महिलांच्या या दमदार सादरीकरणाची उपस्थितांमध्ये विशेष चर्चा रंगली.यावेळी हिरकणी ग्रुपचे नेतृत्व हर्षदा ढोले,स्वाती नागपुरे,हेमलता माळुंजकर यांनी केले.

Back to top button