घरकुलाच्या जागेवरील कथित बोगस नोंदीचा वाद; वडगाव-निंबाळकर ग्रामपंचायतीविरोधातील उपोषण स्थगित
‘मिळकत क्र. ८९७’चा वाद पेटला

घरकुलाच्या जागेवरील कथित बोगस नोंदीचा वाद; वडगाव-निंबाळकर ग्रामपंचायतीविरोधातील उपोषण स्थगित
‘मिळकत क्र. ८९७’चा वाद पेटला.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील वडगाव-निंबाळकर ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सुरू असलेल्या गायकवाड कुटुंबाच्या आमरण उपोषणाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शासकीय घरकुलासाठी असलेल्या निवासी जागेवर कथित बोगस नोंद करून अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते निलेश गायकवाड यांनी केला आहे. माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे मिळकत क्रमांक ८९७ संदर्भातील नोंदी तसेच संबंधित ठरावाच्या क्रमांकाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
संबंधित जागेची नोंद एका व्यक्तीच्या नावावर भोगवटादार म्हणून करण्यात आली असून, त्यासाठी मूळ ठराव किंवा अधिकृत खरेदीखत उपलब्ध नसल्याचा दावा उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तसेच अतिक्रमणाबाबत नोटीस देण्यात आली असतानाही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या कथित बोगस नोंदीची चौकशी करून ती रद्द करावी, जागेवरील हक्क मिळवून द्यावा तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी गायकवाड कुटुंबाने आमरण उपोषण सुरू केले होते.
दरम्यान, बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. या आंदोलनाला बारामती टकारी समाजाच्या वतीनेही पाठिंबा देण्यात आला होता.
आता प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता प्रत्यक्षात कधी आणि कशी होते, तसेच संबंधित नोंदी आणि अतिक्रमणाच्या आरोपांबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे उपोषणकर्त्यांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.






