चलनी नोटांमधून करोना विषाणूच्या संसर्गाचा धोका आहे का?; जाणून घ्या RBI ने काय उत्तर दिलं
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पाठवलेल्या प्रश्नाला रिझर्व्ह बँकेनं दिलं उत्तर
चलनी नोटांमधून करोना विषाणूच्या संसर्गाचा धोका आहे का?; जाणून घ्या RBI ने काय उत्तर दिलं
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पाठवलेल्या प्रश्नाला रिझर्व्ह बँकेनं दिलं उत्तर
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
जगभरातील अनेक देशांमध्ये करोना संसर्गाची भीती नागरिकांच्या मनामध्ये घर करुन बसली आहे. करोनाचा संसर्ग अनेक माध्यमांमधून होतो. यामध्ये अगदी चलनी नोटांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. भारतातील केंद्रीय बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, “चलनी नोटांमध्ये कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस एकाकडून दुसऱ्याकडे पसरु शकतात,” असे संकेत दिले आहेत. त्यामुळेच रोख व्यवहार करण्याऐवजी डिजीटल माध्यमातून होणाऱ्या व्यवसाहारांना प्राधान्य द्यावे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) नुकतचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक पत्र लिहून नोटांमधून होणाऱ्या संसर्गासंदर्भातील माहिती मागवली होती. याच प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयने मेलच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. मात्र थेट उत्तर देण्याऐवजी आरबीआयने सांकेतिक भाषेत हे उत्तर दिले आहे, असं कॅटने म्हटलं आहे.
कॅटने ९ मार्च २०२० रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र पाठवलं होतं. चलनी नोटांच्या माध्यमातून बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रसार होऊ शकतो की नाही यासंदर्भातील स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली होती. हे पत्र अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेला पाठवले. या पत्राला आरबीआयने ३ ऑक्टोबर २०२० रोजी एक मेलच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
कॅटला आरबीआयने पाठवलेल्या उत्तररामध्ये, “करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्राहक आपल्या घरामधून उपलब्ध सुविधेनुसार मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसारख्या ऑनलाइन माध्यमातून डिजिटल पेमेंटचा पर्याय वापरु शकतात,” असं म्हटलं आहे. आरबीआयने नोटांचा वापर करण्याला आणि एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या सुविधेचा किमान वापर करावा असा सल्ला अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोविड संदर्भात सार्वजनिक आरोग्यच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निर्देशांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असंही या उत्तरामध्ये म्हटलं आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी चलनी नोटांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया तसेच कोविड-१९ सारखा व्हायरस वेगाने पसरण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळेच केंद्रातील मंत्र्यांनी आणि संबंधित खात्यांनी याबद्दलचे स्पष्टीकरण तातडीने देऊन माहिती द्यावी यासाठी कॅट प्रयत्न करत आहे. आरबीआयनेही कॅटच्या या प्रश्नाचे सरळ उत्तर न देता सांकेतिक पद्धतीने याचे उत्तर दिलं आहे. आरबीआयने दिलेल्या उत्तरामध्ये चलनी नोटांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रसार होत नाही असं म्हटलेलं नाही. त्यामुळेच आरबीआयने रोख व्यवहारांपेक्षा डिजीटल माध्यमातून व्यवहार करण्याला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे.
भारताबरोबरच अन्य देशांमधील वेगवेगळ्या संस्थांच्या अहवालांमध्ये चलनी नोटांच्या माध्यमातून बॅक्टेरिया आणि व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. भारतामध्ये रोख व्यवहार होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. कॅटने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डिजीटल पेमेंटला अधिक अधिक चालना देण्यासाठी सरकारने एखादी प्रोत्साहन देणाऱ्या योजनेची घोषणा करावी असं कॅटने म्हटलं आहे. यामुळे अधिक अधिक व्यापारी तसेच ग्राहक दैनंदिन कामांसाठी डिजीटल माध्यमांचा वापर करतील असा विश्वास कॅटने व्यक्त केला आहे. रोख व्यवहारांची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलणं गरजेचं आहे. डिजीटल व्यवहारांवर बँकेकडून आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणीही होत आहे.