चिंधीचोर वाटलो काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खंडणीच्या आरोपावर उदयनराजे संतापले
माझ्या गाडीचे टायर २ लाखांचे, मी कशाला दोन लाखांची खंडणी मागेन
चिंधीचोर वाटलो काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खंडणीच्या आरोपावर उदयनराजे संतापले
माझ्या गाडीचे टायर २ लाखांचे, मी कशाला दोन लाखांची खंडणी मागेन
सातारा : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. “चिंधीचोर वाटलो काय? नखातली घाण काढून जगणारे आम्ही नाही. माझ्या गाडीचे टायरच दोन लाखांचे आहेत. मी कशाला दोन लाखांची खंडणी मागेन. वेळ पडली तर भीक मागेन पण खंडणी मागण्याचं काम करणार नाही”, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपांना उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलंय.
अजित पवार यांनी साताऱ्यातील माण तालुक्यात झालेल्या सभेत खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सातारा MIDC मध्ये खंडणी मागत औद्योगिक वसाहतीची वाताहात केल्याची अप्रत्यक्ष टीका केली होती. यावर ‘हिंमत असेल सगळ्यांची ईडी चौकशी करा. कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
साताऱ्यातील एमआयडीसीचा विकास हा टक्केवारीच्या नेत्यांमुळे रखडला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे.
‘मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. कोण काय बोललं मला माहित नाही. हिंमत असेल समोरासमोर यावं. सगळे मिळून ईडी चौकशीला सामोरे जाऊ. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा.’ असं आव्हान देखील उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे.