चोपडज परिसरात बिबटयाचा वावर, हल्ल्यात एक बोकड ठार
वनविभागाच्यावतीने या घटनास्थळाची पाहणी करून संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला

चोपडज परिसरात बिबटयाचा वावर, हल्ल्यात एक बोकड ठार
वनविभागाच्यावतीने या घटनास्थळाची पाहणी करून संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला
लोणी भापकर : वार्ताहर
बारामती तालुक्यातील चोपडज नजीक पवारवस्ती याठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसरात शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे वृत्त कळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.
यापूर्वी बिबट्या मगरवाडी परिसरात असल्याच्या बातम्या दै. पुढारी व प्रसारमाध्यमात आल्या होत्या. चोपडज-पवारवस्ती या परिसरात गेली एक महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याचा दावा येथे काम करणाऱ्या व राहत असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.
सचिन आनंदराव पवार यांच्या गट नंबर ४२ मध्ये उसाच्या रानात बिबट्या असल्याचे ठसे याठिकाणी दिसून आले. रात्री दोन ते तीनच्या सुमारास त्यांचे एक आठ नऊ महिन्याचे बोकड या बिबट्याने फस्त केले. तारकंपाउंड केलेल्या शेळीपालन गोठ्यात बिबट्याने उडी मारून एका बोकडाचा जीव घेतला व त्याची गोट्याच्या पलीकडे असलेल्या जाळीत विल्हेवाट लावल्याची माहिती यावेळी पवार यांनी दिली.
वनविभागाच्यावतीने या घटनास्थळाची पाहणी करून संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. व त्याची भरपाई मिळावी यासाठी वरिष्ठ कार्यालयास रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी वनरक्षक योगेश कोकाटे यांनी दिली.