छत्रपती कारखान्याचा सभासदांना अंतिम दर 2500 रुपये
कारखान्याचा कामगार व सभासदांना दिलासा
बारामती वार्तापत्र
श्री छत्रपति सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामा मध्ये 4,17,425 मे. टनाचे गाळप केले होते व सरासरी रिकव्हरी 10-45 प्रमाणे 4,35,600 क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. मागील हंगाम दुष्काळ व ऊस तोडणी यंत्रणा कमी उपलब्ध झालेने अडचणीचा व कठीण होता. या हंगामात कारखान्याची ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता निव्वळ एफ. आर. पी. 2,472-97 पैसे इतकी होती. सभासदांचा ऊस जसा गाळपास येईल त्याप्रमाणे प्रथम हप्ता 2,100 रुपये प्रतिटन व गेल्या आठवड्यात प्रतिटन रुपये 250 प्रमाणे पेमेंट अदा केले आहे .आज संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये प्रतिटन रुपये 2,500 प्रमाणेअंतिम दर एकमताने ठरवून उर्वरित रक्कम रुपये 150 प्रतिटन व त्यामधून प्रतिटन रुपये 10 प्रमाणे भागविकास निधीपोटी कपात करून उर्वरित प्रतिटन रुपये 140 प्रमाणे पेमेंट दिवाळी सणापूर्वी सभासदांचे खात्यावर वर्ग करणेचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे दिपावलीचे सणासाठी कर्मचार्यांना बोनस / सानुग्रह अनुदानापोटी 10 टक्के रक्कम देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रात अंदाजे 9 लाख मे. टन उसाची उपलब्धता असुन कार्यक्षेत्राबाहेरील अंदाजे 3 लाख मे. टन गेटकेन ऊस घेणेचे ठरले आहे. या हंगामात दोन्ही प्लॅन्ट पूर्ण क्षमतेने चालविणेसाठी पुरेशी यंत्रणा कारखान्याने उपलब्ध केली आहे. त्यापैकी काही यंत्रणा अद्याप येणे बाकी असून गरज भासल्यास जास्तीची यंत्रणा उभारणी करणेचेही ठरविले आहे.
या गळीत हंगाम कोणत्याही परिस्थितीत 12 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे व त्या दृष्टीने आत्तापासूनच योग्य वेळी निर्णय घेऊन संचालक मंडळ वाटचाल करीत आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली हा गळीत हंगाम उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवारसाहेब व राज्यमंत्री, श्री. दत्तात्रय भरणेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडणेसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.
या वर्षी सरासरीपेक्षा जास्त अतिवृष्टी झालेने सभासद शेतकर्यांची नदी व ओढ्यालगतचे ऊस क्षेत्र बाधीत झाले आहे. त्याबाबतही सर्व्हे करून सदरचा ऊस लवकर गाळप करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे. सर्व सभासदांनी आपलेच कारखान्यास ऊस गळितास द्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष श्री. प्रशांत काटे, उपाध्यक्ष श्री. अमोल पाटील व सर्व संचालक मंडळाने केले आहे.