इंदापूर

शेटफळ तलावातून उचल पाणी परवाना देण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी रास्ता रोको

- जलसंपदाच्या कार्यालयासमोर १० गावातील शेतकऱ्यांचे आंदोलन

शेटफळ तलावातून उचल पाणी परवाना देण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी रास्ता रोको

– जलसंपदाच्या कार्यालयासमोर १० गावातील शेतकऱ्यांचे आंदोलन

इंदापूर : प्रतिनिधी

शेटफळ तलावातून जलसंपदा विभागाने नियमबाह्य उचल पाणी परवाने दिले आहेत. सदरचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी लाभार्थी १० गावातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली वकीलवस्ती येथे जलसंपदाच्या कार्यालयासमोर गुरुवारी ( दि.१७) सकाळी ११ वा.पासून एक दिवसीय धरणे आंदोलन व रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेटफळ तलावातून गेली १२५ वर्षांपासून लाभक्षेत्रातील शेटफळ हवेली, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, लाखेवाडी, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी या १० गावांमधील शेतीला पाणी मिळत आहे. मात्र राज्यकर्त्यांनी नियम धाब्यावर बसवून तलावातून ६५ शेतकऱ्यांना बेकायदेशीरपणे उचल पाणी परवाना दिला आहे. तसेच आणखी ५० शेतकऱ्यांचे उचल पाणी परवाने प्रलंबित आहेत. त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रचंड उपसा होऊन, लाभक्षेत्रातील १० गावातील शेती पाण्याअभावी पुर्णपणे धोक्यात येणार आहे. या ६५ शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यास कोणाचा विरोध नाही, परंतु हे शेतकरी ५९ फाट्यावरील दारे क्र. ७, ८, ९ वरून भिजवणारे लाभार्थी शेतकरी असल्याचा शासकीय अहवाल आहे. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने तलावातून उचल पाणी देण्यास १० गावातील जनतेचा व ८ पाणी वापर संस्थांचा ठाम विरोध आहे, असे शेटफळ तलाव बचाव कृती समितीने प्रसिद्धीपत्रकात मध्ये नमूद केले आहे.

जलसंपदाच्या या निर्णयामुळे १० गावातील शेतकऱ्यांच्या पाटचारीने पाणी मिळण्याच्या हक्कावर गदा आलेली आहे. तलावाचा भराव खोदून ३ एचपी पासून २० एचपी पर्यंतच्या अनेक मोटारी अहोरात्र चालू आहेत. त्यामुळे लाभार्थी गावातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला, जनावरांना, नळपाणीपुरवठा योजनांना पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. परिणामी, लाभार्थी गावातील शेतीचे वाळवंट होण्यास विलंब लागणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेटफळ तलाव बचाव कृती समितीने केले आहे. या आंदोलनामध्ये १० गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!