जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं; भाजप खासदारावर जया बच्चन यांनी डागली तोफ.
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी बॉलीवूड संदर्भात देशभरात सुरू असलेल्या चर्चेवरून बॉलीवूडमधून संसदेत आलेल्या भाजप खासदारांना धारेवर धरलं.
जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं; भाजप खासदारावर जया बच्चन यांनी डागली तोफ.
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी बॉलीवूड संदर्भात देशभरात सुरू असलेल्या चर्चेवरून बॉलीवूडमधून संसदेत आलेल्या भाजप खासदारांना धारेवर धरलं.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
यावेळी भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांचं थेट नाव न घेता त्यांनी तोफ डागली. ड्रग्सच्या प्रकरणातून बॉलीवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, काल लोकसभेत एका सभासदाने बॉलीवूड संदर्भात विधान केले.
ते या इंडस्ट्रीतीलच आहेत. ही शरमेची बाब आहे. ‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ हे अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दात त्यांनी रवी किशन यांना सुनावले.
भोजपुरी सुपरस्टार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रवी किशन यांनी सोमवारी लोकसभेत ड्रॅग ट्रॅफिकिंगचा मुद्दा उपस्थित केला. भाजप खासदार रवी किशन म्हणाले की, फिल्म इंडस्ट्रीमध्येही हे वापरले जात आहे. एनसीबीने अनेक लोक पकडले आहेत असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणीची मागणी केली.
ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडच्या अनेक स्टार्सची नावे आली आहेत. जया बच्चन म्हणाल्या की बॉलीवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एंटरटेन्मेंट इंडस्ट्री दररोज जवळपास 5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देते. देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच या गोष्टींना पुढे केले जात आहे. सोशल मीडियावरून आम्हाला लक्ष्य केले जात आहे.
जया बच्चन म्हणाल्या की, ‘सरकारकडून आम्हाला कोणतेही समर्थन मिळत नाही. ज्या लोकांनी फिल्म इंडस्ट्रीतून नाव कमावले त्यांनीच या इंडस्ट्रीला गटार म्हटले. याचे मी बिलकूल समर्थन करत नाही.’
सपा खासदार म्हणाल्या की, या इंडस्ट्रीमध्ये असे काही लोक देखील आहेत जे सर्वाधिक कर भरतात. मात्र त्यांना देखील त्रास दिला जातो. या इंडस्ट्री संदर्भात अनेक आश्वासने दिली गेली, पण ती कधीही पूर्ण करण्यात आलेली नाही. सरकारने मनोरंजन सृष्टीच्या समर्थनात पुढे आले पाहिजे.
जया बच्चन म्हणाल्या की, ही इंडस्ट्री नेहमीच सरकारच्या मदतीसाठी पुढे येते. सरकारच्या चांगल्या कामांना समर्थन देते. कोणत्याही प्रकारचे संकट आल्यानंतर बॉलीवूड आर्थिक मदतीसाठी पुढे येते.
सरकारने एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीची मदत केली पाहिजे. काही खराब लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करणे चुकीचे आहे.
रवी किशन काय म्हणाले होते.
संसदेच्या शून्य काळात अभिनेते खासदार रवी किशन यांनी लोकसभेत सांगितले होते की, ड्रग ट्रॅफिकिंगचे प्रकरण वाढत चालले आहे आणि चीन- पाकिस्तानवरून अंमली पदार्थ देशात येत आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्येही याचा वापर होत आहे, एनसीबीने अनेकांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. केंद्राकडून ड्रग ट्रॅफिकिंगवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.