स्थानिक

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर लिखित‘आनंदीबाई शिर्के : शब्दांच्या पलीकडील सत्य’ ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथामुळे त्यांच्या साहित्याचा नवा अर्थ वाचकांसमोर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर लिखित‘आनंदीबाई शिर्के : शब्दांच्या पलीकडील सत्य’ ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथामुळे त्यांच्या साहित्याचा नवा अर्थ वाचकांसमोर

बारामती वार्तापत्र 

मराठी साहित्यातील समृद्ध परंपरेतील महत्त्वपूर्ण लेखिका आनंदीबाई शिर्के यांच्या जीवनकार्याचा, साहित्यिक योगदानाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दुर्लक्षित पैलूंचा सखोल वेध घेणाऱ्या ‘आनंदीबाई शिर्के : शब्दांच्या पलीकडील सत्य’ या अभ्यासपूर्ण ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा शारदानगर, बारामती येथे उत्साहात पार पडला.

माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. ना. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.
हा ग्रंथ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांनी सखोल संशोधनाच्या आधारे सिद्ध केला असून, हर्षवर्धन प्रकाशन, महाराष्ट्र यांच्यावतीने तो प्रकाशित करण्यात आला आहे. आनंदीबाई शिर्के यांच्या साहित्यिक प्रवासातील अनेक अज्ञात, दुर्लक्षित आणि महत्त्वपूर्ण संदर्भ या ग्रंथातून उलगडण्यात आले आहेत.

प्रकाशन समारंभात बोलताना शरद पवार यांनी प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांच्या संशोधनशील दृष्टीकोनाचे आणि चिकित्सक लेखनाचे विशेष कौतुक केले. आनंदीबाई शिर्के यांचे साहित्य केवळ भावनिक अभिव्यक्तीपुरते मर्यादित नसून त्यामध्ये सामाजिक वास्तव, स्त्रीजीवनाचे प्रश्न आणि मानवी संवेदनांचा सखोल विचार आढळतो.

या ग्रंथामुळे त्यांच्या साहित्याचा नवा अर्थ वाचकांसमोर येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी साहित्याच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरेल, असे सांगत त्यांनी लेखक आणि प्रकाशक दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जवाहर शाह वाघोलीकर, सचिव श्री. मिलिंद शाह वाघोलीकर, खजिनदार श्री. शशिकांत शहा लेंगरेकर यांनीही ग्रंथप्रकाशनाबद्दल समाधान व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ. योगिनी मुळे, डॉ. सचिन गाडेकर, डॉ. अरुण मगर, कला शाखा अधिष्ठाता डॉ. सीमा नाईक-गोसावी, डॉ. अभिनंदन शहा, डॉ. विकास काकडे तसेच रजिस्ट्रार श्री. अभिनंदन शहा यांनी प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक केले.

या सोहळ्याला बारामती परिसरातील प्रा. शारदा मदने, सौ. विद्याराणी चव्हाण, सौ. शिलाराणी रंधवे, सौ. सिंधू पवार, प्रीतम गुळूमकर, संचित मदने यांच्यासह अनेक साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात साहित्यप्रेमी वातावरण अनुभवायला मिळाले.

मराठी साहित्यातील एका महत्त्वाच्या लेखिकेच्या कार्याचा वेध घेणारा हा ग्रंथ अभ्यासक, विद्यार्थी आणि वाचकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Back to top button