‘झिका’ संसर्गाबाबत इंदापूर तालुक्यातील अतिसंवेदनशील गावे जाहीर
जिल्ह्यातील ७९ गावांमध्ये तालुक्यातील ७ गावांचा समावेश

‘झिका’ संसर्गाबाबत इंदापूर तालुक्यातील अतिसंवेदनशील गावे जाहीर
जिल्ह्यातील ७९ गावांमध्ये तालुक्यातील ७ गावांचा समावेश
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यात पहिला झिका रुग्ण पुणे जिल्ह्यातील बेलसर ( ता.पुरंदर ) येथे आढळून आला होता.त्यामुळे केंद्रीय आरोग्य पथकाने नुकतीच सदरील गावाला भेट देऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी झिका प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी नियमावली जाहीर केली असून पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय अतिसंवेदनशील गावे जाहीर केली आहेत.यामध्ये इंदापूर तालुक्यातील ७ गावांचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी,शेळगाव ( वैदवाडी ), यादववाडी,कुरवली,माळवाडी, तक्रारवाडी,भादलवाडी इत्यादींचा समावेश आहे.गाव पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास राज्य सरकारने ग्रामपंचायतींना परवानगी दिली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीनी आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना कराव्यात अन्यथा कर्तव्यात कसूर केल्यास आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) नुसार कारवाई केली जाणार आहे.
खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी परिसर स्वच्छ ठेवावा, जुने टायर्स,फुटके डब्बे, निरूपयोगी वस्तू नष्ट कराव्यात, डासांपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक मलमांचा वापर करावा,आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, फुल बाह्याचे व पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावेत, डास उत्पन्नाची स्थाने नष्ट करावीत पाणी साठविण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या घट झाकणाने झाकाव्यात.
झिका विषाणूची लक्षणे कोणती?
झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंगू आजारासारखी असतात.यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे,डोळे येणे,खांदे व स्नायू दुखणे,थकवा आणि डोखेदुखी यांचा समावेश आहे,ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात.