टीसी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्टचे संकलन
इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट गोळा करून त्याचे रिसायकलिंग करणे ही काळाची गरज

टीसी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्टचे संकलन
इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट गोळा करून त्याचे रिसायकलिंग करणे ही काळाची गरज
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. महविद्यालयाने मागील पाच वर्षापासून ई-वेस्ट मॅनेजमेंट साठी पुढाकार घेतला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयात रिटेल मॅनेजमेंट व बारामती येथील टाटा क्रोमा यांच्या वतीने दोन दिवसीय इलेक्ट्रॉनिक वेस्ट गोळा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्शन मध्ये खराब झालेले चार्जर, रेडिओ, कीबोर्ड, माऊस, हेडफोन, मोबाईल, स्क्रीन अशा अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करून टाटा क्रोमा स्टोअर्सला देण्यात आल्या. या सर्व वस्तूंचे रिसायकलिंग करून पुनर्वापर करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी केले. यावेळी क्रोमा स्टोअरचे व्यवस्थापक सचिन शिंदे उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट गोळा करून त्याचे रिसायकलिंग करणे ही काळाची गरज आहे याने पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यास मदत होईल.
महाविद्यालय अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देते असे याप्रसंगी डॉ.अविनाश जगताप म्हणाले. उपप्राचार्य प्रा.डॉ.अशोक काळंगे, प्रा.डॉ.सचिन गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिटेल मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख प्रा.महेश फुले यांनी हा उपक्रम आयोजित केला. या उपक्रमामध्ये टीसी महाविद्यालयातील तसेच अनेकांत फार्मसी कॉलेज आणि अनेकांत इंग्लिश मेडीयम स्कूलचे सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.