ठेकेदाराकडून बारामतीतील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम;उपमुख्यमंत्री लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
अधिकारी रस्त्यावर येऊन कधीच बघत नाही!
ठेकेदाराकडून बारामतीतील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम;उपमुख्यमंत्री लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
अधिकारी रस्त्यावर येऊन कधीच बघत नाही!
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण व पॅचवर्कच्या दर्जाबाबत बारामती नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कमालीचे उदासीन असल्याचे चित्र आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची नागरिकांची मागणी आहे.
बारामतीत अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे मध्यंतरी झाली. एका रात्रीत या रस्त्यांचे डांबरीकरण उरकण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डांबराचा पॅच ठळकपणे दिसतो. काही ठिकाणी केलेल्या रस्त्यांची खडी लगेचच वर दिसू लागली आहे. रस्त्यावर दुचाकी चालविताना कमालीचे चढउतार जाणवतात.
शहरातील अशोकनगर परिसरात रस्ता केल्यानंतर स्थानिकांनी दर्जाबाबत नाराजी व्यक्त केल्यावर पुन्हा त्यावर थातुरमातूर थर टाकण्यात आला, पण त्यानंतरही या रस्त्यावर खडी बाहेर दिसत असून कमालीचे, उंचवटे जाणवतात. वास्तविक रस्ता करताना नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेमके काय करतात? त्यांना दर्जा खराब आहे हे दिसत नाही का? असा नागरिकांचा सवाल आहे. याबाबत अधिकाऱ्यांना रस्ता पाहणीसाठी वारंवार बोलावूनही अधिकारी फिरकलेच नाहीत.
एकीकडे प्रत्येक दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार कामाच्या दर्जाबाबत कमालीचे आग्रही असतात, दुसरीकडे नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावतात हेच दिसते.
पॅचवर्क करताना खड्ड्याशेजारील खड्डा बुजविला जात नाही. अनेक ठिकाणी पॅचवर्क म्हणजे निव्वळ पाट्या टाकण्याचाच प्रकार असतो. अशा कंत्राटदारांची बिले अधिकारी काढतातच कशी हा खरा प्रश्न आहे. कामे करताना कोण कंत्राटदार काम करतो? त्या कामाची किंमत किती? काम पूर्ण करण्याचा कालावधी किती? याची माहिती फलकावर लावण्याची गरज आहे, लोकांच्या तक्रारी असतील तर त्यावरही विचार होणे गरजेचे आहे.
रस्त्यावरच्या चाऱ्या बुजवताना त्या अशा बुजवतात की तेथे गतिरोधकच तयार होतो. या बाबी अधिकारी रस्त्यावर येऊन कधीच बघत नाही, नागरिकही निमूटपणे वाईटपणा नको म्हणून हा त्रास सहन करत राहतात.
बारामतीत नगरपालिकेच्या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतली जातात. त्यामुळे ही जबाबदारी आपली नाही अशाच आविर्भावात नगरपालिका प्रशासन राहते, उत्तम दर्जाची कामे करून घेण्याची जबाबदारी नगरपालिकाही पार पाडत नाही.