क्राईम रिपोर्ट

तरुणीचा रस्ता अडवून जबरदस्ती केली आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी

गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

तरुणीचा रस्ता अडवून जबरदस्ती केली आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी

गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका गंभीर व संतापजनक प्रकारात बारामती शहर पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई करून आरोपीस अटक केली असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यास येरवडा केंद्रीय कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी देशमुख चौक परिसरात एका तरुणीचा रस्ता अडवून आरोपी ओंकार अशोक जाधव, रा. हरिकृपानगर, ता. बारामती याने तिची गाडी जबरदस्तीने थांबवून चावी हिसकावून घेतली व तिच्या इच्छेविरुद्ध तिला स्वतःच्या घरी नेले. तेथे तिच्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या लज्जेस धक्का पोहोचविणारे कृत्य केले.

सदर गंभीर प्रकाराची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली.

आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यास प्रथम पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली होती. पुढील सुनावणीनंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी (MCR) मंजूर करण्यात आली असून त्यास येरवडा केंद्रीय कारागृहात जमा करण्यात आले आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत स्त्रीच्या लज्जेस धक्का पोहोचविणे, अपहरण करणे, मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

बारामती शहर पोलिसांचा स्पष्ट संदेश असा आहे की, महिलांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा सहन केला जाणार नाही.सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.

गुन्हेगार कोणताही असो, त्यास कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा भोगावीच लागेल.बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याची जरब कायम असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास, छळ किंवा गुन्हा झाल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सदर प्रमाणे कारवाई तपासी अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे यांचे कडून पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार सर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री सुदर्शन राठोड सर, बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Back to top button