…तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं
कंगनाला राज्य सरकार निशाणा बनवत आहे.
…तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं.
कंगनाला राज्य सरकार निशाणा बनवत आहे.
मुंबई – बारामती वार्तापत्र
अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणावरुन बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कंगनाला राज्य सरकार निशाणा बनवत आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे.
याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुलं पत्र लिहिलं आहे. त्यात ते म्हटले आहेत की, तुम्ही महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असं ऐकलं. जर तुम्हाला कायद्याची एवढी चिंता असती तर २०१८ मध्ये मुजफ्फरपूर शेल्टर होममध्ये मुलींवर झालेल्या अत्याचार आठवत असेल. त्यावेळी तुम्ही स्वत: अशी अनेक प्रकरणे जिल्ह्यात समोर येत आहेत असं म्हटलं होतं. तेव्हा नितीश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. इतकचं नाही तर NCRB डेटानुसार बिहारची राजधानी पटणा हे हत्येच्या प्रमाणात देशातील १९ शहरात सर्वात वर आहे. पटणात हत्येचे प्रमाण ४.४. तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या जयपूर ३.१ ने जास्त आहे. हुंड्यासाठी आमच्या बहिणींची हत्या करण्यात पटणा अव्वल आहे. त्याचसोबत २०१८ मध्ये राजेंद्र सिंहसारख्या ५ ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्त्यांची उघडपणे हत्या केली होती. अनेक पत्रकारांचे खून झाले आहेत. भूमाफियांकडून मारहाण, घर जाळणे या घटना बिहारमध्ये सामान्य आहे असं ते म्हणाले.
तसेच सामान्य जनतेचे काय हाल असतील ते सगळ्या घटनांवरुन दिसून येते. गेल्या १५ वर्षात ६ पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची गुन्हेगारांनी हत्या केली. आश्चर्य आहे की, तेव्हा तुमचा पक्ष सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा वापर स्वत:च्या राजकीय लॉन्चिंगसाठी करत अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. पण बिहारच्या बिकट परिस्थितीशी जबाबदारी घेत त्यात सुधारण करणे कठीण आहे. तुम्ही राजकारणासाठी सोपा मार्ग निवडत आहात याचे दु:ख आहे. फक्त राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाही असा इशारा आमदार रोहित पवारांनी चिराग पासवान यांना दिला आहे.
काय म्हणाले होते चिराग पासवान?
चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिकट झाली आहे. केवळ बदला घेण्यासाठीच कंगना राणौतच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली. महाराष्ट्रात राहणाऱ्या बिहारींबद्दल मला चिंता आहे. महाराष्ट्र हा कंगनासह सर्व लोकांनी मिळून बनवला आहे. जर लोकांना अशाप्रकारे निशाणा बनवत असतील तर राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय इतर कोणताही पर्याय नाही, कारण लोक सरकारला घाबरत आहेत असा आरोप चिराग पासवान यांनी केला होता.