ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केलेल्या 12 अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी अपात्र-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
जिल्हाधिकाऱ्यांनी १२ परवाने केले कायमस्वरूपी रद्द; इंदापूर तालुक्यातील दुकानांचा समावेश
ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केलेल्या 12 अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी अपात्र-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
जिल्हाधिकाऱ्यांनी १२ परवाने केले कायमस्वरूपी रद्द; इंदापूर तालुक्यातील दुकानांचा समावेश
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
दिनांक 27- पुणे जिल्ह्यातील मंजूर ताडी अनुज्ञप्तीमधील ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केलेल्या 12 अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी अपात्र करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समक्ष सुनावणी घेवून अनुज्ञप्तीधारक यांच्या विरुध्द गुन्हा नोंदवून न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात सन 2019-20 करीता एकूण 16 ताडी अनुज्ञप्ती कार्यरत होत्या, सदर मंजूर ताडी अनुज्ञप्तीमधून ताडीचे नमुने घेण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी विशेष मोहिम घेतली होती. ताडीचे नमुने घेवून हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था मुंबई यांचे पाठविण्यात आले असता सदर तपासणी अहवालामध्ये एकूण 12 अनुज्ञप्तीमधून काढण्यात आलेल्या ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केल्याचे सिध्द झाले आहे. भेसळयुक्त ताडी सेवनाने मानवी प्रकृतीवर घातक परिणाम होत असल्याची बाब स्पष्ट होत असल्याने सदर अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करून अनुज्ञप्तीधारकाविरुध्द गुन्हा नोंद करुन फौजदारी कारवाई होणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समक्ष सुनावणी घेवून एकूण 12 ताडी अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच संबधीत अनुज्ञप्तीधारक यांना यापुढे ट.ड. 1 अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनुज्ञप्तीधारकाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांचे 15 जुलै 2003 मधील निर्देश तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 77, 78(अ) व 82 तसेच भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 272 अन्वये संबंधीताविरुध्द गुन्हा नोंदवून न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच यापुढेही अवैध ताडी निर्मिती विक्री केंद्र यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेशही देण्यात आले आहेत. ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केलेल्या 12 अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी अपात्र करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे,
श्री. अशोक साहेबराव भंडारी, ताडी दुकान कळंब वालचंदनगर, ता. इंदापूर जि. पुणे,
श्री. चंद्रकांत हनुमंत शिंदे, ताडी दुकान अंथुर्णे क्र. 1, ता. इंदापूर जि. पुणे
श्री. वसवराज वालाप्पा भंडारी, ताडी दुकान थेरगाव, ता. मुळशी जि. पुणे
श्री. सुरेश भिमराव भंडारी, ताडी दुकान केडगाव बोरीपाथी, ता. दौंड, जि. पुणे
श्री. लक्ष्मीनारायण फकिरय्या गौड, ताडी दुकान भिगवन, ता. इंदापूर जि. पुणे
श्री. अविनाश प्रल्हाद भंडारी, ताडी दुकान निरा, ता. पुरंदर, जि. पुणे
श्री. विजय गोपीनाथ भंडारी, ताडी दुकान सणसर, ता. इंदापूर जि. पुणे
श्री. निलम साया गौड, ताडी दुकान लोणावळा क्र. 1, ता. मावळ , जि. पुणे
श्री.अमृत माणिक भंडारी, ताडी दुकान शिंगवे पारगाव, ता. आंबेगाव जि. पुणे
श्री. व्यकटेंश दस्तय्या कलाल, ताडी दुकान बावधन, ता. मुळशी जि. पुणे
श्री. चंद्रकांत हनुमंत शिंदे, ताडी दुकान इंदापूर जि. पुणे
श्री. राजशेखर अनंतराम गौड, ताडी दुकान जक्शन ता. इंदापूर जि. पुणे