तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
दोन सत्रात कार्यशाळा संपन्न झाली.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
दोन सत्रात कार्यशाळा संपन्न झाली.
बारामती वार्तापत्र
आरोग्य ,कायदे ,सुरक्षा विषयावर मार्गदर्शन बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजना अंतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली.
पुणे येथील विलास वाघ मेमोरियल फाउंडेशन च्या संचालक ॲड. प्रतिभा गवळी, मासूम संस्था पुणेच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जया नलगे या प्रमुख वक्त्या म्हणून लाभल्या होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप होते. उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर याप्रसंगी उपस्थित होते.
दोन सत्रात कार्यशाळा संपन्न झाली. पहिल्या सत्रात ॲड. प्रतिभा गवळी यांनी महिला हक्क संहिता विषयक नियम, कायदे व सुरक्षा या
विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बालविवाह प्रतिबंधक कायदा, वारसा हक्क, स्त्री- संरक्षण विषयक कायदे, हिंदू विवाह कायदे, विशेष विवाह कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, कामगार हक्क कायदे इ. कायद्याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वैष्णवी हगवणे प्रकरणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांना व खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता समाजाचा एक जागरूक नागरिक म्हणून लग्नाचा अवास्तव खर्च टाळून ती रक्कम स्वतःच्या भवितव्यासाठी राखून ठेवावी.
हुंडा घेणे म्हणजे स्वतःला विकणे होय. हुंडा प्रथा वाईटच आहे.ती मोडलीच पाहिजे. इतरांवर विसंबून न राहता प्रत्येकाने स्वसंरक्षण
करायला शिकले पाहिजे.असे प्रतिपादन त्यांनी केले.
द्वितीय सत्रात सामाजिक कार्यकर्त्या मासूम संस्था, पुणे यांनी महिलांचे स्वास्थ्य व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना,मुलींनी
व महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. कुटुंबापासून महिलांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यावी. स्त्री ही माणूस आहे.
तिच्या शरीरातील नैसर्गिक बदल समजून घेण्याची भूमिका सर्वांचीच असावी. महिलांमध्ये सर्वात जास्त अनिमियाचे प्रमाण दिसून येते. ही चिंताजनक बाब आहे. मुली व महिला ॲनिमिक राहिल्या तर हिंसा वाढते. सरकारी दवाखान्यातही आरोग्य विषयक समुपदेशन व मार्गदर्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी अजूनही महिला सर्वार्थाने सक्षम झाल्या नाहीत. अशी खंत व्यक्त केली.
महिलांचे साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक दिसत असले तरी शैक्षणिक, राजकीय, शेती, उद्योग क्षेत्र आणि रोजगार निर्मितीमध्ये खूप मोठी दरी आहे स्त्री-पुरुष समानतेचा संख्याशास्त्रीय आलेख मांडून स्त्री-पुरुष असमानता त्यांनी अधोरेखित केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीताने कार्यशाळेचा प्रारंभ झाला.कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. डॉ. सीमा नाईक- गोसावी यांनी सर्वांचे
स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय सहसमन्वयक सौ. सुषमा संगई यांनी करून दिला. प्रा. कल्याणी लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. सुनंदा शेळके यांनी आभार मानले. १२० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.