तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने हक्काच्या पाण्यासाठी हायवेवर जागरण गोंधळ..
मात्र आम्ही सोलापूर करांच्या हिश्श्याचे पाणी मागत नाही

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने हक्काच्या पाण्यासाठी हायवेवर जागरण गोंधळ..
मात्र आम्ही सोलापूर करांच्या हिश्श्याचे पाणी मागत नाही
इंदापूर(प्रतिनिधी) – बारामती वार्तापत्र
तालुक्यातील तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने उजनीचे ५ टीएमसी पाणी उचलून बावीस गावांना देण्याचा निर्णय कायम करावा यासाठी सरकारला सुबुद्धी यावी याकरिता आज (दि.१० ) रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणगाव येथे शासनाच्या नावाने जागरण-गोंधळ घालून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या आंदोलनातून केला.
यावेळी नानासाहेब खरात म्हणाले, तालुक्याकरीता उजनी धरणातून जो ५ टीएमसी पाणी वाटपाचा ठराव मंजूर झाला तो पूर्वरत करावा, उजनीच्या पाण्याचे ऑडीट करावे, मराठवाड्याची २१ टीएमसी पाणी योजना रद्द करावी तसेच उजनी धरणातून बोगद्याद्वारे करण्यात मराठवाड्यात होणारा पाणी पुरवठा मार्ग तात्काळ बंद करावा, उजनीच्या पाण्यासाठी तरटगांव उजनी धरण गेट येथे चालू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी, इंदापूर च्या हक्काचे पाणी इंदापूरला द्यावे तसेच इंदापूर तालुक्यातील ज्या शेतकर्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्यांना मोबदला तात्काळ मिळावा अशा आमच्या मागण्या असून या शासनाने मान्य कराव्यात. आमच्या मागण्या शासनाने मान्य नाही केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी खरात यांनी सरकारला दिला.
तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात, उपाध्यक्ष गणेश शिंगाडे कार्याध्यक्ष संपत पुणेकर, नानासाहेब खरात, अनिता ताटे, संतोष कुंभार, महेश शिंदे यावेळी उपस्थित होते.