स्थानिक

खुर्चीच्या पाया पडत केली कामाला सुरुवात.. सचिन सातव यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा कार्यभार

१६१ व्या वर्धापनदिनादिवशी पार पडल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त

खुर्चीच्या पाया पडत केली कामाला सुरुवात.. सचिन सातव यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा कार्यभार

१६१ व्या वर्धापनदिनादिवशी पार पडल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष सचिन सातव यांनी आज मोठ्या उत्साहात पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे हा सोहळा बारामती नगरपालिकेच्या १६१ व्या वर्धापनदिनादिवशी पार पडल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नगराध्यक्ष खुर्चीच्या पाया पडून नतमस्तक होत आपली जबाबदारी स्वीकारली. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी भावनिक ठरला.

त्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही ग्वाही दिली. या प्रसंगी मुख्याधिकारी पंकज भुसे, सहकारी नगरसेवक उपस्थित होते. सातव कुटुंबिय, अनेक माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना सचिन सातव म्हणाले, बारामतीला देशातील सर्वात सुंदर शहर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान करु. अजितदादांनी जी संधी दिली आहे त्याचे सोने करुन दाखविण्यासाठी पाच वर्ष झटून काम करु.

नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांना आमचे सर्वाधिक प्राधान्य असेल. स्वच्छता, पुरेसे पिण्याचे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, नव्याने होत असलेल्या उपनगरात भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंगची समस्या दूर करण्यासह आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर देणार आहे. तसेच अधिकाधिक डिजिटल सेवा, पारदर्शक प्रशासन आणि जलद निर्णयप्रक्रियेला आमचे प्राधान्य असेल.

समतोल विकास व्हावा हे अजित पवार यांचे स्वप्न असून बहुसंख्य नागरिकांना फायदा होतील अशा योजना प्राधान्याने राबविल्या जातील. बारामती शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे अजित पवार यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू. राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड यासह इतर माध्यमातून प्रबोधन व प्रत्यक्ष कामातील सहभाग या माध्यमातून युवकांना सहभागी करुन घेऊ.

नगरपरिषद प्रशासनाशी संबंधित महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आमच्या महिला नगरसेविकांच्या मदतीने प्रत्येक प्रभागात भेटी देत महिलांच्या अडचणी समजून घेत त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न असेल. बारामतीतील प्रत्येक प्रभागात स्वताः फिरुन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधू. या शिवाय मोबाईल अँपच्या माध्यमातून घरबसल्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्याचे निराकरण आम्ही ठराविक कालावधीत कसे करु याचा प्रयत्न करणार आहोत.

Back to top button