दरवर्षी होणारा गोविंद बागेतील स्नेह भेटीचा कार्यक्रम यंदा रद्द
पवार कुटुंबीयांनी घेतला निर्णय.
दरवर्षी होणारा गोविंद बागेतील स्नेह भेटीचा कार्यक्रम यंदा रद्द
पवार कुटुंबीयांनी घेतला निर्णय.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दरवर्षी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन बारामतीत परंपरेनुसार दिवाळीचा सण साजरा करतात. दिवाळी पाडव्याला हितचिंतकांच्या स्नेहभेटी होतात. पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्या वतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे. बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामूहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम यावर्षी रद्द केल्याबद्दल कुटुंबीयाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे दिवाळीला भेटण्यासाठी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असं आवाहन पवार कुटुंबीयांनी केलं. तसंच कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असंही पवार कुटुंबीयाने सांगितलं आहे.