दिल्ली शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचं षड्यंत्र – रावसाहेब दानवे
याआधी देखील रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढल्यामुळे गदारोळ झाला होता.
दिल्ली शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचं षड्यंत्र – रावसाहेब दानवे
याआधी देखील रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढल्यामुळे गदारोळ झाला होता.
बारामती वार्तापत्र
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचं षडयंत्र असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
गेल्या 13 दिवसांपासून पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. देशातील शेतकरी संघटना तसंच विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
- शेतकरी आंदोलनाबाबत तुम्हाला पडलेले 7 बेसिक प्रश्न आणि त्यांची 7 सोपी उत्तरं
- हमीभाव म्हणजे काय, शेतकरी शेतमाल हमीभावानं खरेदी करण्याची मागणी का करतात?
- शेतकरी आंदोलनासाठी पैसा येतोय तरी कुठून?
शेतकरी आणि सरकार यांच्या सहा वेळा चर्चा झाली तरी यातून तोडगा निघू शकलेला नाही. ही तीन विधेयकं मागे घेण्यात येणार नसल्याची भूमिका सरकारची आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी आंदोलनाचा संबंध थेड चीन आणि पाकिस्तानशी जोडला आहे.
“आंदोलन शेतकऱ्यांचं नसून चीन आणि पाकिस्तानचा यामागे हात आहे. CAA आणि NRC ने मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगण्यात आलं होतं. पण एकतरी मुस्लीम देशाबाहेर गेला का,” असा प्रश्न दानवे यांनी विचारला.
“बाहेरच्या देशानं रचलेला हा कट आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. गेल्या 14 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी बसलेले आहेत त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणे अयोग्य असल्याचं मत शेट्टी यांनी व्यक्त केलं.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवेंचा डीएनए तपासण्यात यावा अशी मागणी केली आहे.
“रावसाहेब दानवे हे सातत्याने शेतकऱ्यांबद्दल बोलत असतात. त्यांचा डीएनए तपासून ते अमेरिकेचे आहेत की पाकिस्तानचे आहेत हे भारत सरकारने शोधावे,” असं बच्चू कडू म्हणाले.
याआधी देखील रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढल्यामुळे गदारोळ झाला होता.