स्थानिक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतील विमान अपघाताचा धावपट्टीजवळचा नवीन व्हिडिओ झाला व्हायरल

धावपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके साचलेले स्पष्टपणे दिसते

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतील विमान अपघाताचा धावपट्टीजवळचा नवीन व्हिडिओ झाला व्हायरल

धावपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके साचलेले स्पष्टपणे दिसते

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत आतापर्यंत हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता.

आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी अपघाताच्या क्षणांचा एक नवा व्हिडीओही माध्यमांसमोर सादर केला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सादरीकरण करताना संबंधित विमान कंपनीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अजित पवार यांच्या खासगी विमानाला नेमका कसा अपघात झाला, हे दर्शवणारा व्हिडीओ त्यांनी दाखवला.

या व्हिडीओमध्ये धावपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके साचलेले स्पष्टपणे दिसते. विमान धावपट्टीच्या बाजूला कोसळल्याचे दृश्य असून त्यानंतर तीव्र आगीच्या ज्वाळा आणि स्फोट झाल्याचेही या चित्रीकरणात दिसून येते. रोहित पवार यांनी या दृश्यांचा संदर्भ देत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. धावपट्टीच्या बाजूला दिसणारी एक रेषा नेमकी काय होती, ती आग होती की अन्य काही, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दृश्यमानता पाच किलोमीटरपेक्षा कमी असताना विमानाचे लँडिंग करण्याची परवानगी का देण्यात आली, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.

बारामती विमानतळावर खासगी विमानांसाठी प्रशिक्षण दिले जाते आणि त्या प्रशिक्षणासाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा अपघात होता की घातपात, याबाबत आमच्याकडे गंभीर शंका असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. उपलब्ध माहितीनुसार कोणावरही थेट आरोप करत नसल्याचे सांगत त्यांनी संबंधित कंपनीने चुकीची माहिती दिल्याचा दावा केला. सरकारवर किंवा कोणत्याही व्यक्तीवर आरोप करण्याचा उद्देश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, मात्र तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीआयडीला पुरेशी अधिकारमर्यादा नसल्याचे सांगत ब्लॅक बॉक्समधील संभाषण कुटुंबातील सदस्यांना ऐकू दिले जावे, अशी मागणीही त्यांनी केली.

या संपूर्ण प्रकरणात राजकीय हेतू नसून व्यवहारिक दृष्टीने काही बाबी दडपल्या जात असल्याची भावना असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तपास जर संथ गतीने केला जात असेल, तर त्यामध्ये गंभीरता दिसून येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. अखेरीस संबंधित वीएसआर कंपनीच्या सर्व सेवा बंद करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करत त्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Back to top button