दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या स्मृतींना आजी-माजी मंत्र्यांनी दिला उजाळा
मखरेंच्या जाण्याने इंदापूर तालुका हा पुरोगामी विचाराला मुकला
दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या स्मृतींना आजी-माजी मंत्र्यांनी दिला उजाळा
मखरेंच्या जाण्याने इंदापूर तालुका हा पुरोगामी विचाराला मुकला
इंदापूर : प्रतिनिधी
येथील माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष स्मृतीशेष पँथर रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आजी-माजी मंत्र्यांनी त्यांच्या गत स्मृतींना उजाळा दिला.यावेळी दिवंगत रत्नाकर मखरेंच्या अस्थींचे पुजन,प्रतिमापूजन तद्नंतर बुद्ध पुजा व प्रवचनाचा कार्यक्रम भंते धम्मसार,बौद्धाचार्य बाळासाहेब धावारे,बाळासाहेब सरवदे यांच्या हस्ते संपन्न झाला. पूजेस शकुंतला मखरे,ॲड.राहुल मखरे,संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीय उपस्थित होते.
दिवंगत रत्नाकर मखरेंच्या जाण्याने इंदापूर तालुका हा पुरोगामी विचाराला मुकला असून आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित व कष्टकरी वर्गासाठी काम केलं. तात्या व माझे जवळचे संबंध होते.कै. शंकरराव भाऊ व माझे वडील कै. शहाजी बापू यांच्याशी त्यांची मैत्री होती.तात्या नगराध्यक्ष झाले.पुढे त्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या माध्यमातून उपेक्षित,वंचित कष्टकरी व भटके-विमुक्तांच्या मुलांसाठी शिक्षणाची व निवासाची सोय केली. त्यांच्या जाण्याने गोरगरिबांचा थोर समाजसेवक आपल्यातून निघून गेल्याची भावना यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मखरे तात्या हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू, लढवय्ये नेते व कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने समाज कार्यात पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांचे योगदान अनमोल आहे. तात्यांचे माझ्यावरती व्यक्तीशा प्रेम होतं. मी नेहमीच त्यांचे मार्गदर्शन घ्यायचो. तात्या माझ्या कामावर खूश व्हायचे, कधी चुकलो तर मलाही सुनवायचे. खऱ्याला खरं आणि खोटयाला खोटं म्हणणारे तात्या स्पष्टवक्ते होते. तात्यांनी माझ्यावरती संस्थेची काही जबाबदारी सोपविली आहे.तात्यांच्या जाण्याने माझा मार्गदर्शक हरपल्याची भावना आपल्या मनोगतातून राज्यमंत्री ना. भरणेंनी व्यक्त केली.
यावेळी ॲड. राहुल मखरेंनी आपल्या प्रास्ताविकात दिवंगत तात्यांनी अथक परिश्रमातून,कष्टातून उभी केलेली ही शिक्षणसंस्था पुढे चालवण्याचे आव्हान नक्कीच आहे. परंतु तात्यांनी दिलेला संघर्षाचा वारसा नक्कीच शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी कामी येईल. असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सुधीर सोनवणे, कैलास चव्हाण,कैलास कदम,प्रा. कृष्णा ताटे, बलभीम राऊत, अनिल मोरे,तुळशीराम जगताप,ॲड. बापूसाहेब साबळे, संजय घोडके, तानाजी धोत्रे, आनंदराव थोरात, ॲड.समीर टिळेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी दिवंगत रत्नाकर मखरेंच्या स्मृतिदिन कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत तात्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.सूत्रसंचालन नानासाहेब चव्हाण यांनी केले तर आभार नानासाहेब सानप यांनी मानले.