दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने, राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं.
दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने, राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं.
मुंबई: प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईतील मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.
महापौरांसह दिशाच्या पालकांनी केली होती तक्रार
दिशा सालियन प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरयांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या काही सदस्या दिशा सालियनच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी तिच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी सालियनच्या पालकांनी देखील राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जातेय असा आरोप करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती.
काय आहे प्रकरण?
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होती. तसेच दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याचीही चौकशी केली जात होती. त्याशिवाय दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यानतंर याप्रकरणाची मालवणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी पोलिसांनी तपास पूर्ण केला होता. नुकतंच पोलिसांकडून याबाबतचा रिपोर्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना आढळलेले नाही, असे नमूद करण्यात आले आहे होते.