इंदापूर

एसटी महामंडळ कामगारांच्या कृती समितीने विविध मागण्यांसाठी बंद पुकारला ; वाहतूक ठप्प

विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या संदर्भात कर्मचारी आक्रमक

एसटी महामंडळ कामगारांच्या कृती समितीने विविध मागण्यांसाठी बंद पुकारला ; वाहतूक ठप्प

विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या संदर्भात कर्मचारी आक्रमक

इंदापूर : प्रतिनिधी

एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या संदर्भात एसटी महामंडळ कामगारांच्या कृती समितीने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर बंद पुकारून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.त्यामुळे इंदापूर बस स्थानकात गुरुवारी ( दि.२८ ) लांब पल्ल्याच्या कवचितच काही गाड्या येत असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागत असून त्यांची मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान उपोषणकर्ते एसटी कर्मचारी श्रीराम सुगावे म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या उपोषणामुळे प्रवाशांचे जे हाल होत आहेत त्यामुळे त्यांची सर्व प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या मागण्या सरकार दरबारी सादर केलेल्या आहेत. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. राज्य सरकार कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे. पाच टक्‍क्‍यांची वाढ दिल्याने कर्मचार्‍यांची दिवाळी गोड झाली म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्या हे साफ चुकीचे आहे.चारशे ते पाचशे रुपयांमध्ये कोणाचीही दिवाळी गोड होत नसते. अडीच हजाराच्या बोनसमध्ये काहीच होत नाही.तेलाचा डब्बा घेतला तरी तो सहविशे ते सत्ताविशे रुपयांना आहे.

तसेच कर्मचारी अमोल आटोळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारने मागील वेळेस झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी सांगितले होते की, एसटी महामंडळाला वेतन आयोग लागू केला तर बाकी महामंडळे येथील व म्हणतील वेतन आयोग द्या ते मी देऊ शकत नाही. परंतु सध्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एसटी महामंडळ सोडून ५७ ते ६० महामंडळांना आयोग लागू झाला आहे. एसटी महामंडळाला दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा.

यावेळी प्रवासी नवनाथ जाधव म्हणाले की, दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घेऊन एसटी सेवा पूर्ववत करावी.

काय आहेत मागण्या

थकित महागाई भत्ता मिळाला पाहिजे, सर्व कामगारांना ग्रेड पे ची रक्कम मिळाली पाहिजे, वाढीव घरभाडे ८,१६,२४ च्या दराने मिळाले पाहिजे,४८४९ कोटी मधील शिल्लक असलेले १८५४ कोटी रक्कम कामगारांना मिळाली पाहिजे,सर्व सण उचल १२ हजार ५०० रुपये मिळाली पाहिजे, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळाले पाहिजे, दिवाळी बोनस १५ हजार रुपये मिळाला पाहिजे, कामगार कराराप्रमाणे कामगारांना नियमित वेतन दिले गेले पाहिजे,सन २०१६ ते २०२० चे आर्थिक लाभ सर्व सेवानिवृत्त व सेवेतील कामगारांना मिळाले पाहिजेत तसेच ठरल्याप्रमाणे वार्षिक वेतन वाढीचा दर २ ऐवजी ३ टक्क्याने वाढवून मिळाला पाहिजे,दिवाळीपूर्वी कामगारांना आर्थिक लाभ मिळाला पाहिजे अशा विविध मागण्या संयुक्त कृती समिती कडून करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button