‘देव तारी त्याला कोण मारी’ अभिनेता सलमान खान याला सापाने दंश
नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल
‘देव तारी त्याला कोण मारी’ अभिनेता सलमान खान याला सापाने दंश
नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल
प्रतिनिधी
‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण सलमान खानच्या प्रत्येक चाहत्याला आज पटली आहे. एक दिवसापूर्वी साप चावल्यानंतर सलमानला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा सर्वांचे श्वास रोखले गेले, पण या मोठ्या अपघातालाही सलमानने पराभूत केले. सलमान आता बरा आहे आणि त्याने त्याचा 56वा वाढदिवस त्याचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या साथीने पनवेल फार्महाऊसमध्ये भव्य पद्धतीने साजरा केला.
सलमानच्या पनवेल फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ अभिनेत्याच्या फॅन पेजवर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये सलमान खान त्याची छोटी भाची आयतसोबत केक कापताना दिसत आहे. कारण 27 डिसेंबरला त्याची भाची आयत हीचा वाढदिवसही सलमान खानसोबत साजरा केला जातो.
सलमान खानने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याने म्हटले, फार्म हाऊसमधील खोलीत सापाने शिरकाव केला. त्यावेळी घरातील लहान मुले प्रचंड घाबरली होती. सापाला बाहेर काढण्यासाठी मी लाकडाची काठी मागितली, ती लहान होती. त्यानंतर लाकडाची मोठी काठी मला देण्यात आली. या काठीच्या आधारे मी सापाला काळजीपूर्वक उचलले आणि घराबाहेर आणले. काठीवर असलेला साप माझ्या हाताच्या दिशेने येत होता. सापाला घराबाहेर नेत असताना मी दुसऱ्या हातात काठी घेतली आणि त्याला घराबाहेर सोडले.
सलमान खानने म्हटले की, तेथे असलेल्या लोकांना आणि स्थानिक ग्रामस्थांना तो साप कंदारी प्रकारचा आहे. मात्र, त्या ठिकाणी होत असलेल्या आरडाओरड, गोंधळामुळे सापाने एकदा नव्हे तर तीनदा दंश केला. त्यानंतर आम्ही रुग्णालयात गेलो. त्या ठिकाणी मला अॅण्टी-वेनम इंजेक्शन देण्यात आले. आतापर्यंत मी सर्व प्रकारचे अॅण्टी-वेनम इंजेक्शन घेतले असल्याचे सलमान खानने म्हटले.
सापासोबत सेल्फी
सलमान खानने म्हटले की, सापाने दंश केला तेव्हा बहीण अर्पिता खूपच घाबरली होती. तोपर्यंत माझी आणि सापाची मैत्री झाली होती. त्याच्यासोबत मी सेल्फीदेखील काढला असल्याचे सलमानने हसत-हसत सांगितले.
सलीम खान यांनी घेतली फिरकी
सर्पदंशाच्या घटनेनंतर वडील सलीम खान यांच्याशी सलमानचे बोलणे झाले. सलीम खान यांनी सलमान खानची फिरकीच घेतली. सलीम खान यांनी साप जिवंत आहे का, याची विचारणा केली होती. त्यावेळी टायगर ही जिवंत आहे आणि सापदेखील जिवंत असल्याचे सांगितले. सापाला मारले नाही, असेही त्यांनी विचारणा केली. त्यावर मी सापाला प्रेमाने, काळजीपूर्वक सोडून दिले असल्याचे सांगितले.
हे सेलिब्रेटी होते उपस्थित
सलमान खानने आपला 56 वा वाढदिवस जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत साजरा केला. फार्म हाऊसवर केक कापताना सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता, तिचा पती आयुष शर्मा आणि सलमान खानची कथित गर्लफ्रेंड उलिया वंतूरदेखील उपस्थित होते.
त्याशिवाय, हॉलिवूड अभिनेत्री समंथा लॉकवूड, संगीता बिजलानी, बॉबी देओल, जेनेलिया डिसोझा, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा, निर्माता साजिद नाडियादवाला (कुटुंबासह), निर्माता रमेश तौरानी, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, झहीर इक्बाल, निखिल द्विवेदी (कुटुंबासह) , मनीष पॉल, वत्सल सेठ, माजी काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकी आणि काही निवडक लोक उपस्थित होते.