शहरात रहायला गेलेली कुटुंबे आता शेतात रमायला लागली
अनेक कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी-धंद्यासाठी शहरात भाडोत्री घर घेऊन राहत होती

शहरात रहायला गेलेली कुटुंबे आता शेतात रमायला लागली
अनेक कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी-धंद्यासाठी शहरात भाडोत्री घर घेऊन राहत होती
बारामती वार्तापत्र
शेतकरी कुटुंब आता गाव सोडून शेतात राहणं पसंत करत आहेत
कोरोनाने घातलेले थैमान आणि शहरातून गावाखेड्यांकडे परतणारी गर्दी पाहून ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतलीय. शेतकरी कुटुंबाने आता गाव , शहर सोडून शेतात राहणं पसंत केलंय. राज्यातील ही कोरोना रुग्णांची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदी आणि निर्बंध लागू करण्यात आलेत. त्यामुळे शहरात गेलेले नागरिक आता गावाकडे परत येत आहेत. लहान गावात माणूस एकमेकांच्या संपर्कात येतोच. त्यापेक्षा आपल्या शेतात राहिलेले बरे, त्यामुळे शेतातील रोजची कामे ही करता येतात.
अनेक कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी-धंद्यासाठी शहरात भाडोत्री घर घेऊन राहत होती मात्र आता उद्योग धंदा तसेच इतर आस्थापना बंद आहेत उद्योगधंद्यांमध्येही उपस्थिती निम्म्यावर आली आहे. त्यामुळे शहरात बसून खर्च वाढविण्यापेक्षा व कोरोनाची आफत ओढवन्या पेक्षा आपल्या शेतातच राहणे अनेक जणांनी पसंत केले.
गावापासून दूर राहणंच चांगलं
पूर्वी साथीचे आजार फार येत असे, त्यावेळी सुद्धा ग्रामस्थ शेतातच राहणे पसंद करीत. प्लेगची साथ आली त्यावेळी गावात माणसं पटापटा मरू लागली. तेव्हा गावातले उंदरांनी भरलेले घर सोडून लोकांनी शेतात राहायला सुरवात केली होती. कोरोनामुळे आताही तशीच धास्ती निर्माण झालीय असून आपला जीव वाचवण्यासाठी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी शेताची वाट धरली आणि आपल बस्तान त्या ठिकाणी मांडलंय.
उन्हाळी कामांना सुरुवात
कोरोनाच्या भीतीने शेतात बिऱ्हाड हलवलेल्या कुटुंबातील महिलांनी उन्हाळी पदार्थ करण्याचा घाट घातलाय. कुरडया,पापड, लोणची, सांडगे, शेवया, असे वर्षभरासाठी लागणारे पदार्थ घरोघरी बनवायला घेतलेत. शिवाय पुरुष मंडळी आणि लहान मुले या बांधावरून त्या बांधावर चकरा मारणे. या झाडाखालून त्या झाडाखाली पडी मारणे, एखाद्या झाडावरील मधाचं पोळं काढणं, पोहायची हुक्की आली तर विहिरीत मस्त डुबकी मारून तासंतास पोहत बसणं असे उद्योग ही मंडळी करीत आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचं पालन
कोरोनाच्या या परिस्थितीत शेतात जाऊन राहण्याचा हा पर्याय गावकऱ्यांनी केव्हाच शोधलाय. इथे दूरदूरपर्यंत कुणाची संबंध येत नसल्याने सोशल डिस्टन्सिंग खऱ्या अर्थाने पाळलं जातेय शिवाय शेतातील झाडाच्या गार सावलीत मस्तपैकी खाट टाकून सेल्फ क्वारंटाईनची मजाच वेगळी. रोजगाराच्या निमित्ताने शहरात गेलेल्या माणसांनी आता आपल्या गावाची कास धारलीय. आणि गावापेक्षा गड्या आता आपलं शेतच बरं असं म्हणत गावात राहणारी माणसं शेताकडे निघालीत.