देशात ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न -हर्षवर्धन पाटील
उपक्रमाअंतर्गत 7360 मजुरांची आरोग्य तपासणी

देशात ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न -हर्षवर्धन पाटील
उपक्रमाअंतर्गत 7360 मजुरांची आरोग्य तपासणी
इंदापूर:प्रतिनिधी
ऊस तोडणी मजूरांची उसाच्या फडात जाऊन मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचाराचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. हा अतिशय चांगला उपक्रम देशात राबविला जावा, यासाठी राज्य व राष्ट्रीय साखर कारखाना माध्यमातून प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली .
लाखेवाडी येथे तानाजीराव नाईक यांच्या ऊस तोडणी फडात मजुरांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम झाला. इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शंकरराव पाटील अरोग्य केंद्राच्या फिरता दवाखाना उपक्रमांतर्गत मजुरांच्या तपासणी कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. हर्षवर्धन पाटील हे राज्य व राष्ट्रीय साखर कारखाना संघावर संचालक म्हणून पदाधिकारी आहेत.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, दि. 3 जानेवारी पासून हा उपक्रम चालू झाला. आज अखेर 50 दिवसांत नीरा भीमा कारखाना व कर्मयोगी कारखान्याच्या 7360 मजूर, महिला मुले यांची ऊस फडावरती व कोपीवरती जाऊन तपासणी करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार इंदापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले आहेत. पद्मा भोसले यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे,असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ऊस फडात जाऊन आरोग्य तपासणी करण्याचा हा पहिलाच उपक्रम असून इंदापूर तालुक्यामध्ये कायमस्वरूपी राबविला जाणार आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसाठी मोठे काम केले, त्यांच्यामुळे ऊसतोड मजुरांना अनेक सुविधा उपलब्ध झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
प्रास्ताविक किरण खंडागळे यांनी केले. यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंह पाटील, तानाजी नाईक, कुंडलिक अनपट, शिवाजी घोगरे, वामन निंबाळकर, के.के.अनपट, वसंत नाईक, रवी पानसरे, महादेव चव्हाण,कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील उपस्थित होते.