बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास तेलंगणाचे कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांची भेट
शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने झाले प्रभावित

बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास तेलंगणाचे कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांची भेट
शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने झाले प्रभावित
बारामती वार्तापत्र
तेलंगणा राज्याचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांच्यासह शिष्टमंडळाने बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. याठिकाणी सुरु असलेले अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान पाहून ते प्रभावित झाले.
एस. निरंजन रेड्डी यांच्यासह राज्याचे कृषी सचिव बी. जनार्दन रेड्डी, कृषी संचालक एल. वेंकटराम रेड्डी, सहसंचालक व्ही सरोजिनी देवी, उपसंचालक एम.व्ही. मधुसूदन, अपेडाचे उपमहासंचालक नागपाल लोहकरे, संशोधन संचालक डॉ. ए. भगवान, उपसंचालक के. वेणुगोपाल शिष्टमंडळात समावेश होता.
यावेळी रेड्डी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी योजना सुरू केल्या आहेत. मात्र आता राज्य सरकारला शेतकऱ्यांचे फक्त उत्पादन वाढविण्यात नाही, तर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यात रस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला भेट देण्याची सूचना केली होती. मी व माझ्यासमवेतचे सर्व अधिकारी हे काम पाहून प्रभावित झालो. हे काम छोटे व सोपे नाही. शिक्षणापासून ते शेतीपर्यंत खूप मोठे काम येथे झाले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तेलंगणामध्ये यातील ज्या गोष्टी करणे शक्य आहे, अशा गोष्टींचा आम्ही अभ्यास केला
ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत करून येथील कृषी तंत्रज्ञान प्रसाराच्या कामाची माहिती दिली. रेड्डी यांनी कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. पुणे जिल्ह्यातील भौगोलिक माहिती, येथील मृदा व पाण्याची स्थिती जाणून घेतली. येथील जिवाणू प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेची माहिती घेतली. येथील भाजीपाला उच्च गुणवत्ता केंद्रासही त्यांनी भेट दिली. मधमाशीपालन व शेती उत्पादन वाढण्यासाठी त्याच्या उपयोगाची त्यांनी माहिती घेतली.